नांदेड : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीचे संकट अजूनही सुरुच आहे. २५ एप्रिल रोजी दुपारी चार तालुक्यांमध्ये गारपीटीने बचावलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
मागील वर्षीच्या खरीप हंगामापासून जिल्ह्यात अतिवृष्टी, गारपीट, वादळी वाऱ्याच्या संकटाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहे. २५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यात वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह पावसाला प्रारंभ झाला. ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा सुटला होता. नांदेड शहरासह लोहा, कंधार, किनवट, हिमायतनगर, अर्धापूर, कंधार या तालुक्यांमध्य जोरदार पाऊस झाला आहे.
तर हिमायतनगर, नांदेड, अर्धापूर आणि कंधार या तालुक्यात गारपीट झाली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने ग्रामीण भागात अतोनात नुकसान झाले. माहूर तालुक्यातील कुपटी व परिसरात अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली. रस्त्यावर झाडे उन्मळून पडली आहेत. नायगाव तालुक्यातील गडगा, शंकरनगर, वाई बाजार या भागातही वादळी वाऱ्यासह पावसाने नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मागील आठवड्यातच गारपीट झाली होती. या गारपीटीतून बचावलेली उन्हाळी पिके नेस्तनाबूत झाली आहेत.