नांदेड : गत चार वर्षांपासून कोरड्या दुष्काळाने होरपळणाऱ्या नांदेड जिल्ह्यावर यंदा परतीच्या पावसाची अधिकच कृपा झाल्यामुळे ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे़ यावर्षी प्रथमच पावसाने शतक साजरे केले आहे़ एकूण १०५ टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली आहे़
जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात पावसाने दिलासा दिल्याने पाणी टंचाईचे संकट दूर झाले़ नद्या, नाले, प्रकल्प, बंधारे पाण्याने भरले आहेत़ यावर्षीच्या पावसाची सरासरी कासवगतीने वाढली़ सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली़ त्यामुळे अर्धशतक गाठलेला पाऊस ७० टक्क्यांच्या दिशेने पुढे सरकला़ उत्तरा व हस्त नक्षत्राने साथ दिल्याने शेतकरी सुखावला होता़ त्यातच विष्णूपुरी प्रकल्पही पूर्ण भरला़ मात्र दसऱ्यानंतर परतीच्या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला़ जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ९५५ इतके आहे़ २० सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात ६८५़८८ मि़मी़ म्हणजेच वार्षिक सरासरीच्या ७४़४३ टक्के पावसाची नोंद झाली होती़ त्यानंतर या टक्केवारीत हळूहळू वाढ होवू लागली़
परतीच्या पावसाने शेवटच्या टप्प्यात ९० टक्क्यापर्यंत पावसाची नोंद झाली़ तर ३० आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात ९५०़८६ मि़ मी़ एकूण पावसाची नोंद करण्यत आली़ १० ते ११ तालुक्यातील पावसाची नोंद शंभर टक्केहून अधिक झाली आहे़ जिल्ह्यात हदगाव, किनवट, माहूर या तालुक्यात मात्र इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे़ तर सर्वाधिक पाऊस मुखेड, कंधार तालुक्यात झाला आहे़ परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून काढणीला आलेल्या सोयाबीन, कापसाची मोठी हानी झाली आहे़ त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर परतीच्या पावसाने संकट आणले़ यावर्षी सोयाबीन व कापसाचे पीक चांगले आले होते़ मात्र, हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला़ परंतु या पावसाने भूगर्भातील पाणीपातळी उंचावली असून नद्या, नाल्यांना पाणी वाहत आहे़ त्यामुळे येणाऱ्या काळातील पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे़ १ जून ते ३० आॅक्टोबर या कालावधीत झालेल्या पावसाची तालुकानिहाय वार्षिक टक्केवारी पुढील प्रमाणे, नांदेड- १२०़८० मि़ मी़, मुदखेड- १४७़०७, अर्धापूर - १०२़८४, भोकर- १००़०३, उमरी - ९८़८७, कंधार- १३०़५१, लोहा- १२५़२१, किनवट- ७९़४३, माहूर - ८०़२३, हदगाव- ७८़७१, हिमायतनगर- ९३़०५, देगलूर- ९९़५२, बिलोली- १०७़०६, धर्माबाद- ११६़९४, नायगाव- ११४, मुखेड- ११९़०६ मि़मी़
२ नोव्हेंबरपर्यंत पाऊसहवामान खात्याने मराठवाड्यातील बहुतांश जागी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे़ २ नोव्हेंबरपर्यंत नांदेड, लातूर, उस्मानाबाद परभणी, हिंगोली, बीड या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह पाऊस होणार असल्याचा अंदाज असून सावधानता बाळगावी,असे आवाहन केले आहे़