- अनुराग पोवळे
नांदेड : जिल्ह्याचे एकूण विस्तारित क्षेत्र पाहता अधिकाऱ्यांना बैठका व इतर कामांसाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करताना नूतन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच न. प. मुख्याधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. इटणकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी जिल्हाभरातील अधिकारी विविध संघटनांचे पदाधिकारी येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात सदिच्छा भेट घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यावेळी संवाद साधताना जिल्हाधिकारी डॉ. इटणकर हे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना आता यापुढे कामासंदर्भात आपण थेट व्हिडीओ कॉन्फरन्सवर बोलू, असे स्पष्ट केले. यासाठी आवश्यक यंत्रणांची उभारणी करा, असे निर्देशही त्यांनी या अधिकाऱ्यांना दिले आहे. जिल्ह्यातील किनवट, देगलूर, माहूर, कंधार हे तालुके लांब अंतरावर आहेत. त्याचवेळी शासकीय अधिकाऱ्यांचा येण्या-जाण्यात वेळ जावू नये या हेतूनेही व्हिडीओ कॉन्फरन्सवर संवाद साधण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधण्यासाठी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, न.प. मुख्याधिकारी यांना तांत्रिक मदत करण्याच्या सूचना जिल्हा सूचना विज्ञान केंद्राचे अधिकारी प्रफुल्ल करणेवार यांना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या अत्याधुनिक व्हिडीओ कॉन्फरन्सींग सुविधेप्रमाणे तालुकास्तरावर अत्याधुनिक अशी सुविधा उपलब्ध होणार नसली तरीही व्हिडीओ डेस्क टॉप या वेबबेस्ड सॉफ्टवेअरच्या आधारे कॉन्फरन्सींग करता येणार आहे. विशेष म्हणजे हे सॉफ्टवेअर मोफत आहे. त्यामुळे इतर तांत्रिक बाबींसाठी कमी खर्च लागणार आहे.
आगामी १५ दिवसांत हे काम पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकींना उपस्थित राहण्याची आवश्यकता राहणार नाही. त्याचवेळी इतर तातडीच्या बाबीसाठीही थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधता येणार आहे. यातून वेळेची बचत तर होईलच. त्याचवेळी कामाची गतीही वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या कार्यकाळात हा प्रयोग राबविला होता. मात्र, त्यास कनेक्टिव्हिटीच्याअभावी म्हणावे तसे यश प्राप्त झाले नव्हते. मात्र, सध्या परिस्थिती बदलली आहे. भारत नेट प्रकल्पांतर्गत संपूर्ण जिल्ह्यात इंटरनेट कनेक्टीव्हीटी दिली जात आहे. त्यामुळे आता कनेक्टिव्हिटी अडचण येणार नाही, असे चित्र आहे.
नांदेडमध्येच राहणाऱ्या अधिकाऱ्यांचे काय?जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख अधिकारीही नांदेडातच राहतात. तालुकास्तरावर त्यांची दररोज ये-जा असते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एखादी बैठक असल्यास अधिकारी नांदेडमध्येच असत. आता तालुकास्तरावर संपर्क साधावयाचा असल्यास हे अधिकारी नांदेडमध्येच आढळले तर नवल नसावे? जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीच्या कारणावरुन तालुका कार्यालयात त्या दिवशी अनुपस्थितीच राहत होती. ती अनुपस्थिती आता ठेवता येणार नाही. त्यामुळे तालुकास्तरावरील कामेही गतीने होतील.