नांदेड: जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्या सभापती यांच्या निवडीचा मुहूर्तही लवकरच जाहीर होणार आहे. मंगळवारी राज्य शासनाने याबाबतची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत जिल्हा परिषदेचे कारभारी बदललेले दिसणार आहेत. दरम्यान, १३ डिसेंबर रोजी पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण जाहीर होणार असून या आरक्षणाकडेही अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत सत्ताबदल झाल्यानंतर जिल्ह्यातही राजकीय गणित बदलण्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभमीवर पंचायत समित्यांसह जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विषय समित्यांच्या निवडी कमालीचे महत्व येणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेत एकूण ६३ सदस्य आहेत. यात सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे ३८ एवढे संख्याबळ होते. परंतु विधानसभेपूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने राजेश देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे संख्याबळ चारने घटले आहे.
दुसरीकडे माजी आमदार प्रदीप नाईक आणि शंकर अण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वाखालील सर्व सहाही सदस्य काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या १० पैकी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गटाचे चार सदस्य आहेत. म्हणजेच, शिवसेनेकडे ही सहा इतके संख्याबळ असून राज्यातील सत्ताबदलानंतर काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत शिवसेना जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी होण्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात असल्याने विषय समित्यांच्या निवडीबाबत मोठ्या प्रमाणात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, १० डिसेंबर रोजी राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणकीयाबतही कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. २३ ऑगस्ट २०१९ रोजी १२० दिवसांच्या कालावधीसाठी अध्यक्ष, उपाध्यक्षासह इतर निवडी तात्पुरत्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. २० डिसेंबर रोजी १२० दिवसांचा कालावधी समाप्त होत असल्याने या निवडीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.