लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाभरात आंदोलन झाले. यातील काही ठिकाणी आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते. याप्रकरणी आता पोलिसांनी कारवाई सुरू केली असून जिल्ह्यातील विविध अकरा पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, दंग्यास चिथावणी देणे, दगडफेक करणे तसेच प्रतीकात्मक पुतळ्याच्या दहनप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मराठा आरक्षणासाठी विविध संस्था संघटनांच्या वतीने मंगळवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंददरम्यान, घडलेल्या विविध घटनासंबंधी पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. येथे वाहनांवर दगडफेक करुन ७२ हजारांचे नुकसान करण्यात आले होते तर भाग्यनगर पोलीस ठाण्यात रस्ता अडविणे, वाहनांच्या काचा फोडणे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या शासकीय वाहनावर दगडफेक करुन दहा हजारांचे नुकसान करणे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या वाहनाच्या बोनेटवर दगडफेक करुन २० हजारांचे नुकसान केल्याप्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सहयोगनगर कॉर्नर येथील मनपा कार्यालयात जावून शासकीय मालमत्तेचे सुमारे ५० हजारांचे नुकसान केल्याप्रकरणीही भाग्यनगर पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विष्णूपुरी परिसरात अज्ञात तीन ते चार आरोपींनी घोषणाबाजी करीत परिवहन महामंडळाच्या तीन गाड्यांवर दगडफेक केली होती. याप्रकरणी ५४ हजारांचे नुकसान झाल्याची फिर्याद वाहकाने दिली. त्यावरुन ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२७, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबरोबरच मुखेड पोलीस ठाण्यात शासकीय काम करताना अटकाव केल्याप्रकरणी अन्य एका गुन्ह्याची नोंद झाली आहे. उस्माननगर पोलीस ठाण्यात सार्वजनिक रोडवर दगड टाकून अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर कंधार येथे राज टायरच्या दुकानासमोर विविध वाहने तसेच सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. बारड बसस्थानक येथे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तर नायगाव येथे शासनाचा प्रतीकात्मक पुतळा जाळल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. किनवट पोलीस ठाण्यातही दोन गुन्हे दाखल झाले आहेत. बंद दुकानावर दगडफेक करीत दहशत निर्माण केल्याबद्दल गुन्ह्याची नोंद झाली आहे तर किनवट तालुक्यातील घोटी शिवार येथे वाहनांना अडवून वाहतूक ठप्प केल्याप्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे.---मुखेड येथे हॉटेलमधील तोडफोड प्रकरणी गुन्हाकंधार येथे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी, मुदखेड तालुक्यातील बारड येथे रस्ता अडवून जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी नायगाव येथे शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याची होळी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, मुखेड येथे लोखंडे चौकातील ओमसाई हॉटेलमधील खुर्च्या-टेबलची मोडतोड करुन खाद्यपदार्थाचे नुकसान केल्याची तसेच महिलेच्या गळ्यातील सव्वादोन तोळ्याचे गंठन जबरीने तोडून घेतल्याची फिर्याद होती. या फिर्यादीवरुन मुखेड ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हिंसक आंदोलनप्रकरणी नांदेड जिल्ह्यात अकरा गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 1:00 AM