- श्रीनिवास भोसले
नांदेड : जिल्ह्यात गुरूवारी पहाटेच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली़ ७ मे रोजी जिल्ह्यात एकुण ५८२़७१ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे़ सदर पावसामुळे मागील आठ महिन्यांपासून बंद असलेला सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे़ तर बळीराजाची खरीप पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे़.
नांदेड जिल्ह्यात मागील आठ दिवसात तीन ते चारवेळा मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली़ वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने केळी, फळबागांचे नुकसान झाले़ परंतु, मृगाच्या अगोदर बहुतांश भागात चांगला पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे़ दरम्यान, नांदेड तालुक्यातील खरबी, निळा, महिपाल पिंपरी, मालेगाव, अर्धापूर, हिमायतनगरसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी कापूस आणि हळद लावगड सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ खरीपपूर्व मशागतीनंतर जमिनीवर आलेला काडी-कचरा उचलून रान निटनेटकं करण्यात महिला शेतकरी व्यस्त झाल्या आहेत़ थंड वातावरणामुळे आणि शेतात महिला-पुरूष शेतकऱ्यांची चहुबाजुने सुरू असलेली लगबग पहायला मिळत आहे़
दरम्यान, गुरूवारी जिल्ह्यात ५८२़७१ मि़मी पावसाची नोंद झाली़ यामध्ये नांदेड तालुका - २९ मिमी, मुदखेड - ४६़३३ मिमी, अर्धापूर - ३१़६७ मिमी, भोकर - ५४़५० मिमी, उमरी - २८ मिमी, कंधार - ३२़६७ मिमी, लोहा - २२़५० मिमी, किनवट - ३२़७१ मिमी, माहूर - ६७़५० मिमी, हदगाव - ६७़८६ मिमी, हिमायतनगर - ९३ मिमी, देगूलर -७़३३ मिमी, बिलोली - ११़२० मिमी, धर्माबाद - ५़६७ मिमी, नायगाव - २८़२० मिमी, मुखेड - २४़५७ पावसाची नोंद झाली आहे़
सहस्त्रकुंड धबधबा पर्यटकांना खुणावतोयमराठवाडा आणि विदर्भाची सीमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैनगंगा नदीवर इस्लापूर परिसरात असलेला सहस्त्रकुंड धबधबा गुरूवारी झालेल्या पावसाने ओसंडून वाहत आहे़ गतवर्षी या भागात पाऊस कमी झाल्याने पर्यटकांना सहस्त्रकुंड धबधब्याचा फारसा आनंद घेता आला नव्हता़ परंतु, यंदा पहिल्याच पावसात सहस्त्रकुंड धबधब्याचे विहंगमदृष्य पर्यटकांना खुनावत आहे़
गुरूवारी मध्यरात्री हिमायतनगर तालुक्यात सर्वाधिक ९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ या पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील अनेक ठिकाणी नुकसान झाले़ अचानक आलेल्या धो-धो पावसाने नदी-नाल्यांना पाणी आले़ यामध्ये शेती साहित्य वाहून गेले़ तर शहर परिसरात २५ ते ३० मेंढ्या दगावल्याची माहिती आहे़