नांदेड : पीक कर्ज वाटपात उदासिनता दाखवणाऱ्या तीन बँकांना जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी फौजदारी कारवाई का करू नये, अशी नोटीस बजावली असून दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
खरीप हंगामाच्या पीक कर्ज वाटपाबाबत जिल्ह्यातील बँकांना उद्दिष्ट निश्चित करून दिले आहे़ याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठकाही घेतल्या़ या बैठकीतही अनेकांचे प्रतिनिधी गैरहजर असतात़ इंडियन ओव्हरसीस बँकेला खरीप पीक कर्जाचे ६ कोटी ३० लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ मात्र बँकेने आजघडीला केवळ ३४ लाखांचे पीक कर्ज वाटप केले आहे़ अशीच परिस्थिती बँक आॅफ इंडियाचीही आहे़ बँक आॅफ इंडियाला खरीप पीक कर्जाचे ७७ कोटी ३६ लाखांचे उद्दिष्ट दिले होते़ बँक आॅफ इंडियानेही आजघडीला केवळ १ कोटी ३३ लाखांचे पीक कर्ज वाटप केले आहे़ ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्सने तर रुपयाही पीक कर्ज वाटप केले नाही़ बँकेला ८ कोटी २७ लाखांचे पीक कर्जाचे उद्दिष्ट दिले आहे़
बँकांच्या या उदासिन धोरणाची जिल्हाधिकारी डोंगरे यांनी गंभीर दखल घेतली आहे़ बँकांच्या उदासिन धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ ही बाब गंभीर असून शासन शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध असतानाही बँकेकडून प्रतिसाद न मिळाल्याने उपरोक्त तीन बँकांना भारतीय दंड संहिता कलम १८७ अन्वये फौजदारी स्वरुपाची कारवाई का करू नये अशी नोटीस बजावली आहे़
याचवेळी शेतकऱ्यांना खरीप पेरणीपूर्वी कर्ज वाटप करणे आवश्यक आहे़ याबाबत जिल्हा समन्वय समितीमार्फत वारंवार बैठका घेवून उद्दिष्टपूर्तीच्या सूचना दिल्या होत्या़ या सूचना व आदेशानंतरही उद्दिष्टपूर्ती न करणे ही बाब भारतीय रिझर्व्ह बँकेने ३ जुलै २०१७ रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी आहे़ त्यामुळे ही नोटीस बजावल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे़ या नोटीसचा दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत़ खुलासा सादर न केल्यास एकतर्फी कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे़