नांदेड : मुख्य डाक घरासह ५१ उपडाकघरांचा कारभार मंगळवारपासून एकाच संगणकीय प्रणालीमध्ये सुरु झाला असून जिल्ह्यातील ४१८ शाखा डाकघरांमध्येही संगणकीय कारभाराला प्रारंभ होणार असल्याची माहिती नांदेड विभागाचे डाक अधीक्षक एस.एम. अली यांनी दिली.
नांदेड विभागाचा सीएसआय अर्थात कोर सिस्टीम इंटीग्रेशन प्रणाली राबविण्यासाठी समावेश करण्यात आला होता. या एकाच संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी नांदेडमध्ये दोन दिवस पोस्ट विभागाचा कारभार थांबविण्यात आला होता. त्यानंतर नव्या संगणकीय सीएसआय प्रणालीला ३० जानेवारी रोजी डाक अधीक्षक एस. एम. अली यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
मंगळवारी सकाळी सीएसआय सिस्टीमद्वारे पहिली पावती एका ग्राहकाला देण्यात आली. पूर्वी डाक विभागात सर्व कामे वेगवेगळ्या संगणकीय प्रणालीमध्ये केली जात होती. त्यात फिनॅकल मोडूलद्वारे पोस्ट आॅफिस सेव्हिंग बँकचे कार्य होत होते. मॅक कॅमिश मोडूलद्वारे रक्कम वाटप केल्या जात असे. तर मेघदूत मोडूल ज्यात पाँईट आॅफ सेलद्वारे बुकींग व डिस्पॅच, स्पीडनेट द्वारे पोस्टचे बुकींग व डिस्पॅच, सब अकाऊंटद्वारे उपडाकघर व शाखा डाक घराच्या व्यवहाराचे हिशेब, ट्रेझरी मोडूलद्वारे सर्व पैशांचे हिशेब केल्या जात होते. आता हे सर्व मोडूल एकाच संगणकीय प्रणाली अर्थात कोर सिस्टीम इंटीग्रेशनद्वारे ३० जानेवारीपासून कार्यान्वित झाले आहेत.
या प्रणालीद्वारे पोस्ट आॅफीसच्या सर्व प्रकारच्या सेवा गतीमानतेने तसेच पारदर्शकपणे देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे डाक अधीक्षक अली म्हणाले. या प्रणालीद्वारे कामाची गतीही वाढेल. जिल्ह्यातील उर्वरित ४१८ शाखा डाकघरांचे कामकाजही संगणकीय प्रणालीद्वारे लवकरच केले जाणार आहे. त्यासाठी रुरल इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ते एमसीडी हे अत्याधुनिक उपकरण खरेदी करण्यात आले आहेत. सीएसआय सिस्टीमसाठी राज्यात पहिल्या टप्प्यात नाशिक, जळगाव, परभणी, मुंबईसह ६ जिल्ह्यांचा समावेश केला होता. नांदेडसह उस्मानाबाद, अहमदनगर, चंद्रपूर, ठाणे या डाक विभागात ही प्रणाली मंगळवारपासून सुरु झाली आहे. तिस-या टप्प्यात बीड, मिरज, मुंबई, नागपूर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये संगणकीकृत कामकाजाला सुरुवात होणार आहे.