नांदेड : येत्या बुधवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे़ या यादीनुसार जिल्ह्यात ३४ हजार ९१३ नव्या मतदारांची नोंदणी झाली आहे़ मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी ३७ हजार ५३५ अर्ज प्राप्त झाले होते़ त्यातील १ हजार ७८२ जण अपात्र ठरविण्यात आले आहेत़ यातील बहुतांश जणांना आॅनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करताना केलेल्या चुका भोवल्या आहेत़
निवडणूक आयोगाने १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या एक महिन्याच्या कालावधीत मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविली होती़ या मोहिमेअंतर्गत १ जानेवारी २०१८ रोजी वयाचे १८ वर्षे पूर्ण करणाºया व्यक्तीस मतदार यादीमध्ये येण्यासाठी अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते़ याबरोबरच या एक महिन्याच्या काळात मतदारांना त्यांच्या पत्त्यातील दुरूस्तीसह नावे वगळण्याबाबतची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली होती़ पूर्वी राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून आॅनलाईन स्वरूपात नावनोंदणी केली जात असे़, परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नव्या नियमानुसार आयोगाने देशपातळीवर एकाच संकेतस्थळावर नावाची नोंदणी करण्याचे आदेश दिले होते़
जिल्ह्यात नवीन नावनोंदणी बरोबरच स्थलांतर, वगळणे अशा प्रकारचे सुमारे ९० हजारांहून अधिक अर्ज मतदार नोंदणी विशेष मोहिमेसाठी राबविलेल्या एक महिन्याच्या कालावधीत प्राप्त झाले होते़ त्यातील ८२ हजार ९८२ अर्ज मंजूर करण्यात आले़ तर उर्वरित अर्ज प्रशासनाने फेटाळले आहेत़ नाव, वय, पत्ता दुरूस्तीसाठी आलेल्या ३३ हजार १३८ अर्जांपैकी २५७३ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले़ स्थलांतरासाठी आलेल्या ७७५ मधून १० जणांचे अर्ज फेटाळण्यात आले. फेटाळण्यात आलेल्या अर्जांमध्ये मोठ्या प्रमाणात आॅनलाईन पद्धतीने अर्ज करणाºयांचा समावेश आहे़