नांदेड : जिल्हा परिषदेच्यावतीने आॅनलाईन प्रक्रियेद्वारे जिल्ह्यातील ४ हजार ५८ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या असून विस्थापित शिक्षकांना नेमणुका देण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, या बदली प्रक्रियेसाठी काही शिक्षकांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या तक्रारी आल्याने बदल्या झालेल्या सर्वच शिक्षकांच्या कागदपत्रांची उलटतपासणी करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
२८ मे रोजी आॅनलाईन प्रक्रियेद्वारे शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. तालुकानिहाय बदल्या झालेल्या या बदली प्रक्रियेदरम्यान १०९५ शिक्षक विस्थापित झाले होते. त्यांना नेमणुका देण्यासंबंधीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र बदली प्रक्रियेसाठी काही शिक्षकांनी अपंगासह इतर कागदपत्रे सादर केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीची दखल शिक्षण विभागाने घेतली असून गुरुवारी काही सदस्यांनी या संबंधीचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर बदलीसाठी शिक्षकांनी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे बनावट कागदपत्रांचा आधार घेतलेल्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.
याच बैठकीत विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा मुद्दाही उपस्थित झाला. मागील वर्षीपासून गणवेशाचे पैसे संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यावर टाकले जात आहेत. सदर रक्कमेत चांगल्या दर्जाचा गणवेश मिळत नाही. दुसरीकडे काही विद्यार्थ्यांचे बँक खाते नसल्याने या रक्कमाही पडून राहिल्या. ही परिस्थिती केवळ नांदेडमध्येच नव्हे तर राज्यभरात आहे. मात्र किमान यावर्षी विद्यार्थ्यांना गणवेश मिळतील, यासाठी योग्य ते नियोजन करावे, अशी मागणी सभापती माधवराव मिसाळे यांनी केली. आता शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळवून देण्यासाठी काय नियोजन करते याबाबत उत्सुकता आहे.