- सुनील चौरे
हदगाव (जि. नांदेड) : दारु सोडवितो असे सांगून कथित औषधी पिल्याने दोन सख्ख्या भावाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी हदगाव येथील एका व्यसनमुक्ती केंद्रावर घडल्याने हे व्यसनमुक्ती केंद्र चर्चेत आले आहे़ बोगस पदवीच्या आधारे डॉक्टर म्हणवून घेणारे रवींद्र पोधाडे हे मांत्रिकाचे काम करत असल्याचे समोर आले आहे़.
परळी येथील संजय ज्ञानदेव मुंडे (वय ३८) व विजय ज्ञानदेव मुंडे (वय ३५) या दोघांना काही दिवसांपासून दारुची सवय होती. ही सवय सोडण्याचे प्रयत्न मुंडे बंधू करत होते. यातच हदगाव येथील व्यसनमुक्ती केंद्रात ते दारु सोडविली जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. या माहितीवरुन ते ६ डिसेंबर रोजी सकाळी हदगाव येथे आले. तेथे आल्यानंतर त्यांना काही वेळानंतर एक औषधी पिण्यास दिली. यातच त्यांचा मृत्यू झाला. शहराच्या मध्यभागी आझाद चौकामध्ये पार्वती हॉस्पिटलमध्ये या डॉक्टराने आपला व्यवसाय थाटला आहे़ ग्रामीण भागातील रूग्ण त्यांच्या या रूग्णालयात उपचार घेतात़ गर्भधारणा, भूत- पिशाच्च काढणे, गुप्तधन, मूलबाळ होत नाही, अशांना औषधी देण्याचे कामही हे डॉक्टर करत असल्याची माहिती समोर आली आहे़
दोन वर्षांपासून बोगस डॉक्टरांविरूद्ध चळवळ उभी राहिली होती़ अनेकांवर गुन्हेही दाखल झाले़ त्यामध्ये मात्र हे डॉक्टर सुटले होते़ त्यांच्याकडे बीईएमएस ( बॅचलर आॅफ इलेक्टोपाथ मेडीसीन सिस्टीम)ही वैद्यकीय पदवी असल्याचे सांगितले जाते़ मात्र, त्यानंतरही इंजेक्शन व औषधी देण्याचे अधिकार नसताना ते रूग्णांना सर्रास इंजेक्शन, औषधी देत होते़ तालुक्यातील वैद्यकीय अधीक्षक अथवा आरोग्य पथकाने याकडे कानाडोळा केल्यामुळेच दोघांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे़ रूग्णांच्या नातेवाईकांचे अज्ञान, आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत अशा रूग्णांना लिंबू, धागा, गंडे, अंडे, बकरे, कोंबडे ओवाळून फेकण्याचे सल्लेही ते देत असल्याचे सांगण्यात आले़
जीव कासावीस होवून दोघांचाही झाला मृत्यू परळी तालुक्यातील तळेगाव येथील संजय मुंडे व ज्ञानदेव मुंडे हे दोघे रवींद्र पोधाडे यांच्याकडे दारू सोडवण्यासाठी आले होते़ त्यांना पिण्याचे औषध देण्यात आले़ औषध पिऊन परतीच्या प्रवासाला लागले असताना ३० किलोमीटर अंतर जाताच संजय मुंडे यांच्या पोटात आग उठली़ जीव कासावीस करत असल्याचे त्यांनी सांगितले़ त्यांना पिण्याचे पाणी देताच त्यांचा मृत्यू झाला़ त्यानंतर एका तासाने त्यांच्या भावालाही तोच त्रास होवून त्याचाही मृत्यू झाला़
डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हानांदेड येथून दोन्ही भावंडांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंडे यांच्या नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ हदगाव पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली़ यावर पोलिसांनी हदगाव येथे येण्यास सांगितले़ अखेर विलास गोविंद मुंडे यांच्या फिर्यादीनंतर रवींंद्र पोधाडे याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोधाडे यास हदगाव पोलीसांनी अटक केली आहे़