नांदेड : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून जलस्वराज्य - २ कार्यक्रम राबविण्यात येत आहे़ जिल्ह्याला ५० कोटींचे उद्दिष्ट असून आजपर्यंत ४९़७५ कोटींच्या सहा योजना तयार असून चार योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली तर उर्वरित दोन योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत़
ग्रामीण भागातील स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत़ यामध्ये नांदेड तालुक्यात २ योजना, बिलोली - २, उमरी- १ आणि किनवट तालुक्यात १ अशा सहा योजनांची कामे सुरू आहेत़ नांदेड तालुक्यात वाजेगाव येथे ७़७१ कोटी तर गोपाळचावडी येथे ७़७८ कोटींची योजना मंजूर झाली आहे़ या दोन्ही योजनांची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून निविदेचे ईव्हालेशन प्रस्ताव मध्यवर्ती कार्यालय, मुंबईकडे पाठविण्यात आलेले आहेत़ सदर योजनेतून पाणीपुरवठ्यासाठी आमदुरा बंधारा येथून पाणीउपसा केला जाणार आहे़ तर किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे राबविण्यात येणार्या १८़५४ कोटींच्या योजनेसाठी लोणी धरणातून पाणीपुरवठा केला जाईल,़ त्यामुळे गोकुंदा शहरातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल़
बिलोली तालुक्यात अर्जापूर आणि सगरोळी येथील कामास प्रारंभ झाला असून या योजनांवर १२़७३ कोटी रूपये खर्च होणार आहे़ अर्जापूर येथील विहिरीचे खोदकाम करून बांधकाम पूर्ण झाले आहे़ तर सगरोळी येथील खोदकाम झाले असून बांधकाम प्रगतीपथावर आहे़ या दोन्ही योजनांतून जवळपास १५ हजार नागरिकांना पाणीपुरवठा केला जाऊ शकेल एवढी क्षमता आहे़ उमरी तालुक्यातील तळेगाव येथे २़९९ कोटींच्या योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे़ पाणीपुरवठ्यासाठी उद्भव विहीर, पंपघर, पंपिंग मशिनरी, उद्धरण वाहिनी, पाण्याची टाकी, वितरण व्यवस्था आणि किरकोळ कामे पूर्ण केली जाणार आहेत.
शुद्ध आणि उच्च दाबाने मिळणार पाणीच्ग्रामीण भागात स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे़ यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत़ राज्य शासनाच्या मुख्यमंत्री पेयजल योजना, जलस्वराज्य योजना, राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत विविध कामे केली जात आहेत़ जलस्वराज्य - २ अंतर्गत जिल्ह्यात सहा ठिकाणी कामे होत आहेत़ या योजनेतून वर्षातील ३६५ दिवसांपैकी ३०० दिवस शाश्वत पाणीपुरवठा केला जाणार आहे़ प्रत्येक दिवशी मानसी ७० लिटर पाणी मिळणार आहे़ प्रत्येक घराला मीटर बसविण्यात येणार असून १० मीटर दाबाने पाणीपुरवठ्याची तरतूद सदर योजनेत आहे़ त्यामुळे सर्वत्र समान व उच्चदाबाने पाणीपुरवठा होईल़