नांदेड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ६ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने शहरावर पाणीबाणीचे संकट घोंगावत आहे. पण त्याचवेळी लोअर दुधना प्रकल्पातून २० दलघमी पाणी घेतले जाणार आहे. हे पाणी आल्यानंतर संकट टळणार असले तरी ते पाणी वेळेत आणण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे.
विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला ५.२० दलघमी पाणी उपलब्ध आहे. हा पाणीसाठा १५ मेपर्यंत पुरेल इतका आहे. त्याचवेळी लोअर दुधना प्रकल्पातून १० ते १५ मे या कालावधीत २० दलघमी पाणी घेतले जाणार आहे. त्यामुळे शहरापुढे पाणी संकट दिसत असले तरी त्यावरील तोडगाही उपलब्ध आहे. मात्र या सर्व बाबी नियोजनाप्रमाणे पूर्ण झाल्या तर नांदेडकरांना पाणी उपलब्ध होणार आहे. त्याचवेळी विष्णूपुरी प्रकल्पात ३ दलघमी मृतसाठा उपलब्ध असतो. या पाण्यावरही शहराची तहान भागू शकते. मात्र मृतसाठा उचलण्यापर्यंतची वेळ येणार नाही असे महापौर शीलाताई भवरे यांनी सांगितले.
गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत पाणी उपलब्धतेची माहिती घेण्यात आली. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले की, शहरासाठी डिग्रस बंधाऱ्यातून २० दलघमी पाणी घेण्यात आले होते. त्यातील १० दलघमी पाणी सिंचन पाळ्यासाठी सोडण्यात आले. त्यानंतर सिद्धेश्वर मधूनही १० दलघमी पाणी घेतले. त्यापैकी ३ दलघमी पाणी विष्णूपुरीत पोहोचले. आता २० दलघमी पाणी १५ मेपर्यंत उपलब्ध होईल. पर्यायी पाणीपुरवठा योजनेसाठी इसापूर धरणातील १० दलघमी पाणी राखीव आहे. त्यापैकी अडीच दलघमी पाणी आसनात घेतले आहे. अडीच दलघमी पाणी घेण्यासाठी चर्चा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पाण्याचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही.
महापौर शीलाताई भवरे यांनी घेतलेल्या बैठकीत अमृत योजनेचा आढावा घेण्यात आला. शहरात अमृत योजनेतून १३२ किलोमीटर अंतरात जलवाहिनी टाकली जाणार आहे. आतापर्यंत ६८.५१ किमी जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. अमृत योजनेअंतर्गत शहरवासियांना पाणी लवकर देण्याचे निर्देशही यावेळी महापौरांनी दिले. यावेळी उपमहापौर विनय गिरडे, नगरसेवक दुष्यंत सोनाळे, किशोर भवरे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यास विरोधशहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र त्याला महापौर शीलाताई भवरे यांनी विरोध करत १७ मेपासून सुरु होणाऱ्या रमजान महिन्याच्या पार्श्वभूमिवर शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करणे उचित ठरणार नाही. सध्याच्या वेळापत्रकानुसार पाणी सोडावे, असे निर्देशही महापौरांनी दिले. शहरात नऊ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. शहरात ७५४ हातपंप आहेत. तर १९३ पावरपंप आहेत. या पंपांचे सर्वेक्षण करुन ते दुरुस्त केले जाणार आहेत.