नांदेड : येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने लातूर जिल्ह्यातील शिवली (ता.औसा) आणि धाराशिव येथील जुना कत्तल खाना येथे छापा टाकून बनावट देशी मद्यनिर्मितीचा कारखाना उघडकीस आणला असून, या कारवाईत १२ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पथकाने अटक केलेल्या आरोपींमध्ये बिहारमधील आरोपींचाही समावेश आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार व संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मौ. शिवली येथे चारचाकी वाहनाने बनावट देशी मद्य वाहतुकीची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार ८ नोव्हेंबर रोजी निरीक्षक एस. एस. खंडेराय यांच्या पथकाने सापळा रचून एक पिकअप वाहन (क्र. एमएच २५ पी २४०५) व बनावट देशी मद्याचे १० बॉक्स व दोन मोबाइल जप्त केले. आरोपी बाळासाहेब घेडीबा जाधव (रा.जातेगाव, ता. गेवराई, जि. बीड), सोहेल मुख्तार पठाण (रा.फकिरानगर, वैराग नाका, धाराशिव) यांना अटक केली.
आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरून जुना कत्तलखाना धाराशिव येथे छापा टाकण्यात आला. तेव्हा बनावट मद्य बाटलीत भरण्यासाठी वापरलेली मशीन, बनावट मद्य भरलेल्या बाटल्या व बनावट लेबल सीलबंद करण्याची मशीन, १८० मिलि क्षमतेच्या ४६०० रिकाम्या बाटल्या, कागदी खोके (कार्टून्स), तीन मोबाइल आदी मुद्देमाल मिळून आला. राहुल कुमार मेहता (रा.अल्लीनगर जि.पूर्णिया बिहार), बाबुचन राजेंद्र कुमार (रा.रोसका कोसका, जि.पूर्णिया, बिहार), गौतम कपिलदेव कुमार (रा. काजा, जि.पूर्णिया बिहार), सोनु कुमार (रा. बनियापटी जि.पूर्णिया, बिहार), सुभाष कुमार (रा.बनियापटी, जि.पूर्णिया, बिहार) या आरोपींना अटक केली आहे. तसेच साहित्य पुरविणारा आरोपी रोहित राजू चव्हाण (रा. नाथनगर, जि.बीड) यासही अटक केली. शशी गायकवाड (रा. आंबेओहळ) हा आरोपी फरार आहे.
या दोन्ही ठिकाणहून १२ लाख ९० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यात आतापर्यंत ८ आरोपींना अटक केली असून, एक आरोपी फरार आहे. दुय्यम निरीक्षक के. जी. पुरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे. आरोपींना तीन दिवसांची एक्साइज कोठडी मंजूर झाली आहे. निरीक्षक एस. एस. खंडेराय तपास करीत आहे.