- प्रा. शरद वाघमारे (मालेगाव, जि.नांदेड)
शेतकरी शेतात विविध पिकांची लागवड करताना पारंपरिक पद्धतीच्या पिकांचे उत्पादन घेत असतात. यामुळे एकतर खर्च जास्त होतो अन् त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. दुष्काळी परिस्थिती, पिकांना योग्य भाव मिळत नाही, अशा स्थितीत अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील शेतकरी अॅड. बालाजी माधवराव कदम या अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या दोन एकर शेतात गेल्या चार वर्षांपासून रेशीम उद्योग सुरू केला आहे. दुष्काळी परिस्थितीमधूनही ते वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवीत आहेत. उत्पादित रेशमाला परराज्यात मोठी मागणी आहे.
व्यवसायाने वकील असलेल्या बालाजी माधवराव कदम यांनी २०१४ साली दोन एकर शेतीमध्ये रेशीम उद्योग सुरू केला. यासाठी त्यांना रेशीम विकास विभागाकडून अनुदान मिळाले आहे. यात त्यांनी शेड व लोखंडी रॅक उभारले आहे. रेशीम उद्योगाची प्रक्रिया वीस दिवसांची आहे. ही प्रक्रिया चार अवस्थांमध्ये असते. एका दिवसात २५० अंडपुंजातून साठ ते सत्तर किलो कोष मिळतो. सद्य:स्थितीत बाजारात ४५० रुपये भाव मिळत आहे. म्हणजेच दिवसाला तीन हजार रुपये मिळतात. यासाठी मजूरही खूप कमी लागतात. पहिल्या आठवड्यात दोन मजूरांवर काम भागते. रेशीम अळ्यांना दररोज सकाळी व संध्याकाळी खाद्य द्यावे लागते.
सुरुवातीला रेशीम उद्योग सुरू करताना केवळ दहा हजार इतक्या कमी प्रमाणात खर्च येतो. खत फवारणीला जास्त खर्च येत नाही. एप्रिल व मे महिन्यात पाण्याची कमतरता पडते. मात्र, या काळात पाणी मिळाले नाहीतर, तुतीच्या झाडावर परिणाम होतो. मात्र, ती झाडे मरत नाहीत. त्यामुळे पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनाही हा व्यवसाय करता येतो. रेशीम व्यवसायात तुती लागवड, कीटक संगोपन, धागानिर्मिती आणि कापडनिर्मिती असे प्रामुख्याने चार प्रकारचे व्यवसाय करता येतात.
अल्पभूधारक शेतकरी कदम यांनी दोन एकर शेतात हा तुतीचा रेशीम उद्योग सुरू केला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील हा पहिला रेशीम उद्योग आहे. तयार झालेले रेशीम कोष बंगळुरू, हैदराबाद याठिकाणी विकल्या जातात. स्वत: शेतकरी बालाजी कदम रेशमाची विक्री करून रोख पैसे मिळवितात. गेल्या चार वर्षांपासून त्यांच्या शेतात रेशीम उद्योग सुरू असून, वर्षाकाठी ते जवळजवळ पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवितात.
शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून बघावे. पारंपरिक पद्धतीने शेती केल्यामुळेच शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या रेशीम उद्योग क्षेत्रात शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे, असा सल्ला कदम यांनी दिला. सद्य:स्थितीत पर्जन्यमान कमी झाल्याने पाण्याचे स्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे पिके हातचे जाण्याची वेळ आली आहे. उत्पादित पिकांना योग्य भाव मिळत नाही; परंतु रेशीम उद्योगात अतिशय कमी खर्चात शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.