नांदेड : शहरातील गुरुद्वारा परिसरात मागील महिन्यात दुचाकीवरून आलेल्या एकाने दोघांवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला होता, तर अन्य एक जण जखमी झाला होता. दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदा याच्या सांगण्यावरून हत्येचा कट रचण्यात आला होता. या प्रकरणात नांदेड पोलिसांनी अगोदर स्थानिक आरोपींना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास छत्रपती संभाजीनगर एटीएसकडे गेला होता. एटीएस आणि पंजाब पोलिसांनी यापूर्वी पंजाबमधून तिघांना पकडले होते. त्यानंतर शनिवारी पंजाबच्या स्पेशल सेलने या प्रकरणात आणखी तिघांना बेड्या ठाकल्या आहेत.
रिंदाच्या भावाच्या खुनात तुरुंगात शिक्षा भोगत असलेला गुरमितसिंघ सेवादार हा मागील महिन्यात पॅरोलवर बाहेर आला होता. तो रवींद्रसिंग राठोड या नातेवाइकासोबत १० फेब्रुवारीला शहीदपुरा भागात असताना त्यांच्यावर एकाने गोळीबार केला होता. यावेळी दहा ते बारा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात हल्लेखोराचे टार्गेट असलेला गुरुमितसिंघ बचावला. मात्र, त्याचा नातेवाइक रवींद्रसिंग राठोड मारला गेला. सुरुवातीला स्थानिक पोलिस या प्रकरणाचा तपास करीत होते.
परंतु, हे प्रकरण दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदाशी संबंधित असल्याने छत्रपती संभाजीनगर येथील एटीएसकडे हा तपास देण्यात आला. या तपास पथकात नांदेडातील काही अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला होता. या पथकाने नांदेडात शूटरला दुचाकी पुरविणाऱ्या आणि मदत करणाऱ्यांना यापूर्वीच बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर पंजाबच्या स्पेशल सेलने मागील महिन्यात जगदीपसिंग उर्फ जग्गा, शुभदीप सिंग आणि सचिनदीप सिंग याला यापूर्वीच अटक केली होती. या सर्वांनी रिंदाच्या सांगण्यावरूनच हा हल्ला घडवून आणला होता. त्यानंतर शनिवारी पंजाबच्या स्पेशल सेलने नांदेडातील गोळीबार प्रकरणात सहभागी असलेल्या जगजीतसिंग उर्फ जग्गी आणि शुभम खुलबुडे यासह गुरदीपसिंग उर्फ दीपा याला अटक केली. जग्गी आणि खुलबुडे हे नांदेडातीलच रहिवासी आहेत. दीपा हा रायचूर येथे राहात होता. त्यांच्याकडून बारा बोअर पंप ॲक्शन गन १५ काडतुसे आणि पिस्टल अन् ८ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे नांदेडातील गोळीबार प्रकरणात पंजाबला पकडलेल्या आरोपींची संख्या आता सहा झाली आहे.
जग्गीने शूटरला पुरविली रसदजगजीतसिंह उर्फ जग्गी हा नांदेडचाच रहिवाशी असून, त्याने हत्येतील शूटरला रसद पुरविली. त्यांना लपण्यासाठी सुरक्षित घर उपलब्ध करून दिले. तसेच इतर आरोपींमध्ये समन्वय राहावा, यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली. हरविंदरसिंघ रिंदाचा जुना सहकारी गँगस्टर दिलप्रीत उर्फ बाबा हा तुरुंगात असून, त्याने त्यांना पंजाबात आरोपींसाठी सुरक्षित आश्रयस्थान उपलब्ध करून दिले होते.
जग्गीवर अनेक गंभीर गुन्हेअटक करण्यात आलेल्या जग्गीवर खून, खुनाचा प्रयत्न, धमकी देणे, खंडणीसाठी धमकावणे यांसारखे गुन्हे दाखल आहेत. नांदेड पोलिसांना तो अनेक प्रकरणामध्ये हवा होता. परंतु, अटक टाळण्यासाठी तो पंजाबमध्ये लपून बसला होता. जग्गी आणि शुभम हे रिंदाच्या निर्देशानुसार नांदेडातील त्याच्या इतर साथीदारांसाठी शस्त्र खरेदी करणे, खंडणीचे पैसे गोळा करणे, लॉजिस्टिक सपोर्ट, आरोपींना आश्रय देणे, या कारवायांमध्ये सक्रिय होते. तिसरा आरोपी दीपा याला जग्गी आणि शुभमला आश्रम दिला होता. तसेच पळून जाण्यात मदत केली होती.