उमरी (नांदेड): तालुक्यातील कुदळा, जामगाव ,शेलगाव, बोळसा गावाच्या शिवारात आज, मंगळवारी दुपारी वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे उन्हाळी पिकांचे बरेच नुकसान झाले आहे.
दुपारी चार वाजेच्या नंतर उमरी तालुक्यात काळे ढग जमा झाले. कुदळा, जामगाव ,शेलगाव ,बोळसा आदी गावांच्या शिवारात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. कुदळा गावाच्या परिसरात अधिक गारा पडल्या. अचानक गारांसह पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. शेतातील आखाड्यावर असलेली गुरेढोरे सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. काहीनी पशुधन थेट गावात आणले.
काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान गारांच्या पावसामुळे उन्हाळी ज्वारी, गहू , भुईमूग आदी पिकांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे, हळद काढणीचा हंगाम सध्या चालू आहे. गारांच्या पावसामुळे हळदीचे बरेच नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. वादळ वारा व गारांच्या पावसामुळे या भागात अद्याप तरी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.