नांदेड : नांदेड लोकसभा मतदार संघातून ७४ वर्षांत केवळ एकमेव महिला खासदार म्हणून सूर्यकांता पाटील यांनी नेतृत्व केले आहे; पण, त्यानंतर दुसऱ्या कोणत्याच महिलेला खासदार होण्याची संधी मिळाली नाही. यावेळी तर खासदार सोडा, एकही महिला उमेदवार रिंगणात नसल्याने दुसऱ्या महिला खासदार निवडण्याची संधी हुकली आहे.
आतापर्यंत नांदेड लोकसभेसाठी एकूण ७२ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत, त्यामध्ये अजून तरी एकाही महिला उमेदवाराचा समावेश नाही. नांदेड लोकसभा निवडणुकीत १९५१ पासून ७५ वर्षांंच्या काळात १९९१ मध्ये सूर्यकांता पाटील यांना काँग्रेस पक्षाकडून पहिल्या खासदार होण्याचा मान मिळाला. त्यांनी या निवडणुकीत २ लाख ५१ हजार २१ मते घेत शिवसेनेचे डी. आर. देशमुख (१ लाख १८ हजार ६५९ मते) यांचा पराभव केला होता. त्यानंतर १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून रंजना दिलीप पाटील या अपक्ष उमेदवार म्हणून एकमेव महिला रिंगणात होत्या. पण, त्यांना केवळ १९४४ मतेच मिळाली होती. त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीपर्यंत एकाही महिला उमेदवाराने खासदारकीसाठी उमेदवारी अर्ज भरला नाही.
माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांना नांदेड लोकसभेत प्रतिनिधित्व केलेल्या जिल्ह्यातील एकमेव महिला सदस्याचा मान मिळतो. १९९१ ते १९९६ अशी पाच वर्षे त्या खासदार म्हणून राहिल्या; तर केंद्रीय राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. तसेच सूर्यकांता पाटील यांनी १९८६ ते १९९१ या काळात राज्यसभा सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे.
३३ टक्के आरक्षणाचे विधेयक मंजूर; पण अंमलबाजवणी नाहीमहिलांना लोकसभेमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याचे नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक लोकसभेत यापूर्वीच मंजूर झाले आहे. २०२१ च्या जनगणनेनुसार महिला आरक्षण ठरणार आहे; पण, ही जनगणना अजूनही झालेली नाही. त्यामुळे ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक मंजूर होऊनही त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे २०२९ च्या निवडणुकीत तर महिला आरक्षणाची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा आहे.
आजपर्यंत झाले १७ खासदारनांदेड लोकसभेत १९५१ पासून २०१९ पर्यंत एकूण १७ खासदार जिल्ह्याला मिळाले; पण, त्यात केवळ एकमेव सूर्यकांता पाटील यांनी महिला खासदार म्हणून नेतृत्व केले आहे. आता दुसरी महिला खासदार म्हणून कोणाला संधी मिळणार, हे महत्त्वाचे आहे.
मीनल खतगावकरांची संधी हुकलीनांदेड लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून मीनल खतगावकर यांना उमेदवारी मिळाली असती तर त्यांना जिल्ह्याच्या दुसऱ्या खासदार होण्याचा मान मिळू शकला असता. पण, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर खतगावकरांना उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीतही खासदार होण्याची संधी हुकली आहे.