नांदेड : विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात पत्नीचा एक्सरे रिपोर्ट तपासण्यास का येत नाहीत, असे म्हणून एका रुग्णाच्या नातेवाईकाकडून बुधवारी रात्री डॉ. रमेश लक्ष्मण ठावरे यांना मारहाण करण्यात आली. डॉ. ठावरे यांना ‘माझ्या पत्नीचा एक्सरे रिपोर्ट तपासण्यास का येत नाही ?, तसेच तपासणी करण्यास टाळाटाळ का केली, असे म्हणून देविदास शिंदे यांनी जाब विचारला. नंतर डॉक्टरशी वाद घालून त्यांना मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी डॉ. रमेश ठावरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एक जणाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कावळे करीत आहेत.निवासी डॉक्टरांतर्फे निषेधडॉक्टरला मारहाण झालेल्या घटनेचा निवासी डॉक्टर संघटनेने निषेध केला. रात्री निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन करून प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच २१ जून रोजी सकाळी संघटनेच्या एका शिष्टमंडळाने अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी अधिष्ठाता म्हस्के यांनी रुग्णालयातील आवश्यक ठिकाणी सुरक्षेत वाढ करण्याचे आश्वासन देतानाच रुग्णालय परिसरात आणखी १४ सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीला मान्यता दिली. यावेळी डॉ. रोहन बडगुजर, सचिव डॉ. ओमप्रसाद दमकोंडवार, डॉ. स्वप्नील गलट, डॉ. योगेश बिरादार, डॉ. आर्शि सिद्दीकी, डॉ. मीनाक्षी एस. प्रदीप, डॉ. प्रिया लहाने, डॉ. मकरंद सनपुरकर, डॉ. मधुरा पोहाळकर, डॉ. अश्विन सोनवणे, डॉ. नैना बोराडे आदींची उपस्थिती होती.
नांदेडला शासकीय रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 6:00 AM