Nanded lok sabha by election 2024: विधानसभेबरोबर नांदेड लोकसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. दोन्ही निवडणुका एकत्र होत असल्याने लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’ हा विधानसभा उमेदवारांच्या विजयावर अवलंबून असणार आहे. सद्य:स्थितीत काँग्रेसचे रवींद्र चव्हाण विरुद्ध भाजपचे डाॅ. संतुकराव हंबर्डे, अशी लढत होत आहे.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपवासी झाले होते. तरीदेखील भाजपला नांदेड लोकसभेत यश मिळविता आले नव्हते. त्यावेळी ५६ हजार ७०३ मताधिक्य मिळवत काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांनी भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता. दुर्दैवाने वसंतराव चव्हाण यांचे २६ ऑगस्ट २०२४ रोजी निधन झाले. त्यामुळे येथे लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. यासाठी महायुती, महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे.
काँग्रेसने मतांचे विभाजन होऊ नये, म्हणून सहा मतदारसंघांतदेखील काँग्रेसचेच उमेदवार दिले आहेत, तर महायुतीकडून चार ठिकाणी भाजप, तर दोन ठिकाणी शिंदेसेनेचे उमेदवार दिले आहेत. त्यामुळे महायुतीच्या मतदारांना दोन मतदारसंघांत दोन चिन्हांवर मतदान करावे लागणार आहे.
लोकसभा २०२४ मध्ये काय घडले होते?
वसंतराव चव्हाण, काँग्रेस : ५,२८,८९४ (विजयी)प्रतापराव चिखलीकर, भाजप : ४,६९,४५२ अविनाश भोसीकर, वंचित : ९२,५१२
नवमतदारांच्या हाती विजयाची दोरी
- लोकसभा निवडणुकीत मतदारांची संख्या १८ लाख ५१ हजार ८४३ एवढी होती. त्यापैकी ११ लाख २८ हजार २५४ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण ६०.९४ टक्के मतदान झाले होते.
- आजघडीला होत असलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत ५६ हजार ७०३ मतदार वाढले असून, एकूण मतदार संख्या १९ लाख ८ हजार ५४६ एवढी झाली आहे.
- त्यामुळे नव्याने वाढलेले मतदार कोणाच्या पथ्यावर पडणार?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.