नांदेड : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या नांदेड जिल्ह्यात धक्कादायक निकाल लागला असून भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा धक्कादायकरित्या पराभव केला. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा. यशपाल भिंगे यांच्यात तिरंगी लढत झाली.
काँग्रेसचा पारंपारिक गड म्हणून ओळख असलेल्या या मतदारसंघात मागील निवडणुकीत मोदी लाटेतही कॉंग्रेसचे अशोक चव्हाण ८१४५५ च्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. आजच्या मतमोजणीच्या सुरुवातीला काही काळ अशोक चव्हाण पुढे होते मात्र त्यानंतर सातत्याने भाजपचे चिखलीकर यांनी मताधिक्य राखले, शेवटच्या फेरीत चिखलीकरांची जवळपास ३६ हजाराची आघाडी होती. अखेरच्या फेरीनंतर त्यांनी ५० हजाराच्या फरकाने विजय मिळवला.
मतदारसंघः नांदेडविजयी उमेदवाराचे नावः प्रताप पाटील चिखलीकरपक्षःभाजप
नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण . मतदार १७ लाख, १७ हजार, ८२५ एवढे असून यंदाच्या निवडणुकीत ६५.१५ टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या अशोक चव्हाण यांचा ४ लाख ९३ हजार ७५ मतांसह विजय साकारला होता, तर भाजपा उमेदवार डी. बी. पाटील यांना ४ लाख ११ हजार ६२० मतं मिळाली होती.