Nanded Lok Sabha By Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला न भूतो न भविष्यती असे यश मिळाले आहे. महायुतीने 225+ जागा मिळवल्या असून, महिविकास आघाडीचा जवळपास सुपडा साफ झाला आहे. भाजपने तर 133+ जागा जिंकून आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, भाजपने विधानसभेसोबत नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही जिंकली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभेत प्रतापराव पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यात लढत झाली. त्यात वसंत चव्हाण 59 हजार 442 मतांनी विजयी झाले होते. पण, वसंत चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली होती. या जागेवर काँग्रेसने वसंत चव्हाण यांचा मुलगा रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपने डॉ. संतुक हंबर्डे यांना मैदानात उतरवले होते. आता या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार डॉ. संतुक हंबर्डे यांचा दणदणीत विजय झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप उमेदवार डॉ. संतुक हंबर्डे यांनी 425574 मते घेत मोठा विजय मिळवला आहे. तर काँग्रेसचे रवींद्र चव्हाण यांना 390149 मते मिळाली. या विजयामुळे भारतीय जनता पक्षातील लोकसभेतील एक जागा वाढली आहे. भाजपला लोकसभेत स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही. त्यामुळे आता डॉ. संतुक हंबार्डे यांच्या विजयामुळे भाजपची संख्या वाढली आहे.