नांदेड : नांदेड महापालिकेच्या महापौर शीला भवरे यांनी आपल्या पदाचा बुधवारी राजीनामा दिला़ काँग्रेस पक्ष निर्णयाप्रमाणे सव्वा वर्षाचा कालावधी महापौर पदासाठी निश्चित करण्यात आला होता़ भवरे यांना १७ महिन्याचा कार्यकाळ मिळाला़
नांदेड महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे़ ८१ पैकी ७४ नगरसेवक काँग्रेसचे आहेत़ १ नोव्हेंबर २०१७ रोजी महापौर शीला किशोर भवरे यांची बहुमताने निवड झाली होती़ अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी पहिल्यांदाच हे पद आरक्षित आहे़ पहिल्या दलित महिला महापौर म्हणून भवरे यांना मान मिळाला़ १७ महिन्याच्या कार्यकाळात शहरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा फुले दाम्पत्याच्या पुतळ्याचे काम करण्यात त्या यशस्वी झाल्या़ वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यासाठी जागा संपादित करण्याचे कामही पूर्ण झाले आहे़
लोकसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा असतानाच निकालाच्या एक दिवस अगोदरच महापौर शीला भवरे यांना पदावरून दूर व्हावे लागले़ त्याचवेळी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्यावरील गंडांतर मात्र तूर्त टळल्याचे दिसत आहे़ आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता गिरडे यांची खुर्ची सध्या तरी शाबुत दिसत आहे़