लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी या वर्षातील सर्वाधिक ४४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे़ पुढील चार दिवस तापमानातील ही वाढ कायम राहणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद हायस्कूलच्या हवामान विभागाचे प्रमुख बालासाहेब कच्छवे यांनी दिली.यंदा मार्च महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नांदेडकरांना हैराण केले होते़ त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातही तापमानाचा पारा जेमतेमच होता़ परंतु गेल्या पंधरा दिवसापासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे़ १९ एप्रिल रोजी नांदेडचे तापमान ४३़५ अंशावर होते़ त्यानंतर २० एप्रिल- ४३, २१ एप्रिल- ४२़५, २२ एप्रिल-४२़५, २३ एप्रिल-४२, २४ एप्रिल-४३, २५ एप्रिल-४२़५, २६ एप्रिल-४३, २७ एप्रिल-४३़२ तर शुक्रवारी नांदेडच्या तापमानाने या वर्षातील उच्चांक गाठत ४४ अंशापर्यंत गेले आहे़ त्यामुळे दिवसभर शहरातील रस्त्यावर शुकशुकाट होता़ सकाळी नऊ वाजतापासून उन्हाची दाहकता जाणवत आहे़ त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड होऊन बसत आहे. वाढत्या उन्हामुळे बाजारपेठेवरही परिणाम होत आहे. येणाऱ्या बुधवारपर्यंत तापमानातील ही वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी वर्तविला आहे़ त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी़
नांदेडचा पारा ४४ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 1:15 AM