लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उड्डाण योजनेअंतर्गत घोषित केलेली नांदेड-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होईल. त्यासोबतच ९९ वर्षे देखभाल करण्यासाठी रिलायन्स कंपनीकडे सुपूर्द केलेल्या नांदेड येथील विमानतळाची धावपट्टी जर कंपनीने दुरूस्त केली नाही तर हे विमानतळ रिलायन्सकडून काढून घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली. आ. अमरनाथ राजूरकर यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त घोषणा केली.देशातील सामान्य माणसाला विमान प्रवास करता यावा व छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी विमानसेवेने जोडता यावे यासाठी केंद्र शासनाने उड्डाण ही महत्वाकांक्षी योजना घोषित केली. योजनेअंतर्गत नांदेड-मुंबई व नांदेड-हैदराबाद विमानसेवेची घोषणा झाली. घोषणेनुसार नांदेड-हैदराबाद विमानसेवा सुरू झाली. परंतु नांदेड-मुंबई विमानसेवेचे मात्र भिजत घोंगडे आहे़ ही विमानसेवा लवकर सुरू व्हावी, यासाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी नागरी उड्डयनमंत्री गजपती राजू तसेच टु-जेट कंपनीच्या अधिकाºयांशी अनेकदा प्रत्यक्ष बोलणी, पत्र व्यवहारही केला.या पार्श्वभूमीवर आ. अमरनाथ राजूरकर यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला. नांदेड-मुंबई ही घोषित झालेली विमानसेवा सुरू करा तसेच श्री गुरूगोविंदसिंघजी विमानतळाची धावपट्टी तत्काळ दुरूस्त करण्याची मागणी त्यांनी केली.या प्रश्नास उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही प्रश्नांसंदर्भात तत्काळ पावले उचलण्यात येतील, नांदेड-मुंबई विमानसेवेसाठी स्टॉल उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ही विमानसेवा लवकरच सुरू होईल, असे सांगितले़त्यासोबतच रिलायन्स कंपनीला ९९ वर्षांसाठी हे विमानतळ दुरूस्ती व देखभालीसाठी दिले आहे. त्यामुळे धावपट्टीची दुरूस्ती करण्याचे काम या कंपनीचे आहे. जर ही कंपनी धावपट्टी दुरूस्त करीत नसेल तर या कंपनीकडून दुरूस्ती व देखभालीचे काम काढून घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले़
नांदेड-मुंबई विमानसेवा लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 12:43 AM