लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेचा ७८६ कोटींचा अर्थसंकल्प शनिवारी स्थायी समितीचे सभापती शमीम अब्दुल्ला यांनी महापौर शीलाताई भवरे यांच्याकडे सुपूर्द केला. प्रशासनाने सुचविलेल्या ७८० कोटींच्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने ६ कोटींची वाढ सुचविली आहे.सभागृहात शनिवारी महापौर शीलाताई भवरे यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय सभा घेण्यात आली. या सभेत प्रारंभी स्थायी समितीचे सभापती शमीम अब्दुल्ला यांनी स्थायी समितीने मंजूर केलेला ७८६ कोटींचा अर्थसंकल्प महापौर भवरे यांच्याकडे सादर केला. त्यानंतर आपल्या मनोगतात स्थायी समितीचे सभापती यांनी हा अर्थसंकल्प शहराच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक कार्यक्रमाचे चित्र असल्याचे सांगितले. उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाच्या बाजूचा ताळमेळ राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शहरवासियांवर कोणत्याही कराचा बोजा न टाकता मूलभूत सुविधांसोबत शहराचा विकास करणे हाच मूलभूत हेतू ठेवून सर्वसाधारण सभेपुढे अर्थसंकल्प ठेवण्यात आल्याचे ते म्हणाले. आयुक्त गणेश देशमुख यांनी सादर केलेले अंदाजपत्रक फुगीर होणार नाही. त्यातून प्रत्यक्षात कामे व्हावीत या उद्देशाने स्थायीने अंदाजपत्रकात ६ कोटी ६५ लाखांची वाढ सुचविली आहे. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि महापालिकेचे महसुली उत्पन्न याचा ताळमेळ बसवित विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे ते म्हणाले. खा. अशोकराव चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सभागृहाने अर्थसंकल्पाच्या अभ्यासासाठी वेळ द्यावा, अशी मागणी गुरुप्रितकौर सोढी, बालाजी कल्याणकर आदी सदस्यांनी केली. ही मागणी मान्य करीत सभा तहकूब केली. आयुक्त गणेश देशमुख, स्थायी समिती सदस्य अब्दुल्ला सत्तार, उमेश पवळे, फारुख अली खान, सतीश देशमुख, भानुसिंह रावत, मोहिनी येवनकर, आनंद चव्हाण आदींची उपस्थिती होती.स्थायी समितीने विशेष पाणीकरात १८ कोटींवरुन २१ कोटी ६५ लाखांची वाढ सुचविली. तर मालमत्ता विभागाच्या अभय योजनेतून ३ कोटी वाढ अपेक्षिली आहे. नगरसेवकांच्या स्वेच्छानिधीसाठी प्रशासनाने ५ कोटींची तरतूद केली. त्यात स्थायी समितीने ३ कोटी ६० लाखांची वाढ केली. क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी २ कोटी १५ लाखांवरुन ५ कोटींची तरतूद केली. तर शहरातील ६ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत वायफाय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पाच लाखांहून २५ लाखांची वाढ सुचविली आहे.
नांदेड महापालिकेचा ७८६ कोटींचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेपुढे सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 1:05 AM
महापालिकेचा ७८६ कोटींचा अर्थसंकल्प शनिवारी स्थायी समितीचे सभापती शमीम अब्दुल्ला यांनी महापौर शीलाताई भवरे यांच्याकडे सुपूर्द केला. प्रशासनाने सुचविलेल्या ७८० कोटींच्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने ६ कोटींची वाढ सुचविली आहे.
ठळक मुद्देसहा कोटींची वाढ : स्थायी समितीने दिली मंजुरी