लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड :अपंग असल्याचे बोगस प्रमाणपत्र काढून महापालिकेत वरिष्ठ लिपीक पदावर पदोन्नती मिळवून शासनाचे विविध लाभ घेतले असल्याबाबत न्यायालयाच्या आदेशावरुन महापालिकेचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्याविरोधात वजिराबाद पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ याबाबत सहाय्यक आयुक्त प्रकाश येवले यांनी न्यायालयात धाव घेतली होती़महापालिकेतील उपायुक्त रत्नाकर कांतराव वाघमारे (कुक्कडगावकर) यांनी अस्तित्वात नसलेल्या अस्थिव्यंग विभागाकडून अपंग असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करीत नगरपालिकेत ३० डिसेंबर १९८७ रोजी वरिष्ठ लिपीक या पदावर पदोन्नती मिळविली़ त्यानंतर १७ जुलै १९९२ रोजी पदाचे पदनाम बदलून अव्वल कारकुन असे दुरुस्ती आदेश करुन घेतले़ अव्वल कारकुन या पदावरुन लेखापाल या पदावर पदोन्नती झाली़ सेवाज्येष्ठतेनुसार वाघमारे यांच्यापेक्षा सात दिवसांनी सेवाज्येष्ठ असतानाही प्रकाश येवले यांना पदोन्नतीपासून डावलण्यात आले़ सेवाज्येष्ठता नसतानाही १७ फेब्रुवारी २००६ रोजी उपायुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली तेव्हापासून ते या पदावर आहेत़ असा आरोप येवले यांनी न्यायालयात याचिकेद्वारे केला आहे़ मागील ३१ वर्षांपासून ते महापालिकेची फसवणूक करीत असल्याचेही याचिकेत म्हटले आहे़ न्यायालयाने या प्रकरणात रत्नाकर वाघमारे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार मंगळवारी वजिराबाद पोलिसांनी वाघमारे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला़---प्रमाणपत्र योग्यच, आरोप निराधारमहापालिका सेवेत असताना आपण सादर केलेले कोणतेही कागदपत्र खोटे व बनावट नसून सर्व प्रमाणपत्र योग्य आहेत. यापूर्वीही असे आरोप झाले होते. मात्र ते चुकीचे होते. या प्रकरणात आवश्यक ती चौकशी प्रशासकीय पातळीवर पूर्ण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात करण्यात आलेले आरोप निराधार व दिशाभूल करणारे असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी दिली.
नांदेड महापालिकेच्या उपायुक्तांवर फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:55 AM