लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत ४१ विषयांना एकमुखी मंजुरी देण्यात आली आहे. काँग्रेसने एकतर्फी बहुमताच्या आधारे शहरातील सर्वच प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या सभागृहनेता आणि विरोधी पक्षनेत्याचा विषय मात्र प्रलंबित ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे भाजपाने मात्र विरोधी पक्षनेत्यांचा कक्ष आपल्या ताब्यात घेतला आहे.महापौर शीला भवरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महापालिका सभागृहात सकाळी ११ वाजता पहिल्या सर्वसाधारण सभेला प्रारंभ झाला. या सभेत स्थायी समिती सदस्य तसेच शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. पहिल्या सभेत नगरसेवकांच्या मानधनवाढीचा विषयही मंजूर करण्यात आला. पूर्वी सदस्यांना ७ हजार ५०० रुपये मासिक मानधन मिळत होते. ते आता १० हजार रुपये प्रतिमाह करण्यात आले आहे.महापालिकेच्या कंत्राटी पद्धतीने असलेल्या ९ वैद्यकीय अधिकाºयांना मुदतवाढीचा विषयही मंजूर करण्यात आला आहे. त्याचवेळी महापालिका हद्दीतील १३ गावांच्या विकास योजना तयार करण्यासाठी प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमानुसार शासनाकडून मुदतवाढ मागण्यात आली आहे. ७ एप्रिल २०१४ पर्यंत मुदतवाढ मंजुरीचा प्रस्ताव या सभेत पारित करण्यात आला. शहरातील शिवाजीनगर भागातील नाना-नानी पार्क येथील कै. सुधाकरराव डोईफोडे ज्येष्ठ नागरिक भवन हस्तांतरणाबाबतच्या ठरावासही सभेने एकमताने मंजुरी दिली. हे ज्येष्ठ नागरिक भवन भाडेपट्टीवर आता आरक्षित केले जाणार आहे. महापालिकेसाठी राज्य शासनाने विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली मंजूर केली आहे. त्याअंतर्गत महापालिकेतील नगररचना विभागाच्या विविध सेवांसाठी सुधारित दराचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार विविध विषयांसाठी आता नवे दर आकारले जाणार आहेत. या दरामध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे.शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव सर्वसाधारण रस्ता अनुदान व विशेष रस्ता अनुदानातंर्गत निधी मागणीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. ४ कोटी ४५ लाख ७० हजार रुपयांच्या १३ कामांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. या प्रस्तावावर चर्चा करताना नगरसेवकांनी आपआपल्या भागातील कामे यामध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली. त्यात जुन्या नांदेडातील कालापूल येथील रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी दीपक रावत, शेर अली यांनी केली तर वसरणी ते नावघाट हा रस्ताही पूर्ण करावा, अशी मागणी दीपाली मोरे यांनी केली. शहरातील प्रमुख रस्त्यावरील खड्ड्यांचा विषयही माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी उपस्थित केला. त्यावेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी शहर खड्डेमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. त्या अनुषंगाने कामाचे प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे सभागृहात सांगितले. अपंगांच्या कल्याणासाठी राखीव असलेल्या ३ टक्के निधीतून करावयाच्या कामांची नियमावली मंजूर करण्यात आली आहे. दलित वस्तीच्या प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली आहे. दलित वस्तीचा प्राप्त निधी आणि आगामी काळात मिळणाºया ३२ कोटी ५० लाखांचे नियोजन प्रशासनाने पूर्ण केले आहे. या प्रस्तावास सभागृहाने मंजुरीही दिली आहे. शहरातील स्वच्छता निविदांनाही मंजुरी देण्यात आली आहे. प्रशासनाने अंतिम मंजुरीसाठी हा ठराव सभागृहापुढे ठेवला होता. त्या ठरावास मंजुरी देण्यात आली.अनधिकृत बांधकामावरील थकित शास्ती माफशहरात महापालिकेच्या कर वसुलीत मोठा अडसर असलेल्या अनधिकृत बांधकामावरील थकित शास्ती माफ करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. काँग्रेसचे गटनेते विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी हा प्रस्ताव मांडला होता. सदर प्रस्ताव मंजूर झाला असला तरीही त्यामध्ये नेमकी कोणती शास्ती माफ करायची, याबाबत चर्चेअंती निर्णय घेतला जाणार आहे. महापालिकेने शहरातील ५ हजार ३१८ मालमत्ताधारकांना जवळपास २० कोटींची थकबाकी लावली आहे. या निर्णयामुळे ती थकबाकी माफ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्याचवेळी दोन-दोन वर्षांपासून थकित असलेल्या कराची वसुली होईल, असा विश्वासही व्यक्त होत आहे.
नांदेड महापालिकेची पहिली सभा ‘झटपट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:50 AM
नांदेड : महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत ४१ विषयांना एकमुखी मंजुरी देण्यात आली आहे. काँग्रेसने एकतर्फी बहुमताच्या आधारे शहरातील सर्वच प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या सभागृहनेता आणि विरोधी पक्षनेत्याचा विषय मात्र प्रलंबित ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे भाजपाने मात्र विरोधी पक्षनेत्यांचा कक्ष आपल्या ताब्यात घेतला आहे.
ठळक मुद्दे९० मिनिटांत ४१ विषय मंजूर : सभागृह नेता, विरोधी पक्षनेत्याची निवड प्रलंबित, नगरसेवकांच्या मानधनात वाढ