लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहर वाहतूक शाखेकडून सध्या वाहतूक सुधारणेसाठी मोहीम सुरु करण्यात आली आहे़ या मोहिमेअंतर्गत वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्यात येत आहे़ रविवारी बसस्थानक परिसरातील हातगाडे व इतर अतिक्रमण शहर वाहतूक शाखेने हटविले़ प्रत्यक्षात अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी मनपाची असताना मनपा पथकाकडून मात्र अतिक्रमधारकांना मोकळी सूट दिली जाते़शहरातील सर्वच रस्त्यांवर विक्रेत्यांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे़ त्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होते़ शहर वाहतूक शाखेकडून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे़ परंतु, पार्कींगसाठी जागाच उपलब्ध होत नसल्यामुळे मोठी पंचाईत होत आहे़ त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी शहर वाहतूक शाखेनेच पुढाकार घेतला आहे़ रविवारी बसस्थानकासमोरील अतिक्रमण केलेले हातगाडे उचलण्यात आले़ मात्र ही कारवाई करताना वाहतूक शाखेला मनुष्यबळ अपुरे ठरत आहे़ त्यामुळे फुटपाथवरील अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेने आपली पथके उपलब्ध करुन देण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे़ मात्र महापालिका त्याकडे कानाडोळाच करीत आहे़ बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूने अनेकांनी हातगाडे लावले होते़ त्यामुळे या ठिकाणाहून बस नेणे मोठे अग्निदिव्यच होते़ याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते़ या वृत्ताची दखल घेत रविवारी शहर वाहतूक शाखेने ही कारवाई केली़विशेष म्हणजे, अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी असलेल्या मनपाच्या पथकाकडून मात्र अतिक्रमणधारकांवर कुठलीही कारवाई करण्यात येत नाही़ मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकात एक पोउपनि आणि सहा कर्मचाºयांचा समावेश असतो़ त्याचबरोबर वाहन आणि मजूरही असतात़ परंतु, अतिक्रमण हटाव पथक दुसºयाच कामात व्यस्त असल्यामुळे शहरातील रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे़ त्यामुळे शहर वाहतूक शाखेच्या या मोहिमेला हातभार लावण्यासाठी मनपा प्रशासनानेही पुढाकार घेण्याची गरज आहे़महापौर : नगरसेवकांना घातले साकडेवाहतूक शाखेचे पोनि़चंद्रशेखर कदम यांनी महापौर शीलाताई भवरे यांच्यासह काही नगरसेवकांशी चर्चा केली़ महापालिकेचे सहकार्य मिळाल्यास शहरात वाहतूक व्यवस्था सुरुळीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़ वाहतूक शाखेने पुढाकार घेतला आहे़ महापालिकाही या मोहिमेत सहभागी झाली तर शहर वाहतुकीचा प्रश्न सुटू शकतो़