नांदेड महापालिकेच्या आठ नगरसेवकांचे पद धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:46 AM2018-04-03T00:46:09+5:302018-04-03T00:46:09+5:30
महापालिकेच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या नगरसेवकांना निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते़ परंतु याबाबत वारंवार सूचना देवूनही काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी अद्यापही जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेच नाही़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिकेच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या नगरसेवकांना निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते़ परंतु याबाबत वारंवार सूचना देवूनही काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी अद्यापही जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेच नाही़ त्यामुळे या आठ जणांचे नगरसेवक पद धोक्यात आले असून त्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ११ एप्रिलची अंतिम मुदत देण्यात आली आहे़
महापालिका निवडणुकीत एकूण ३९ उमेदवार राखीव जागांवर निवडून आले आहेत़ त्यापैकी १५ नगरसेवकांनी आपले जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नव्हते़ प्रशासनाने याबाबत त्यांना सूचना दिल्यानंतर ७ नगरसेवकांनी आपले जातवैधता प्रमाणपत्र सादर केले़ तर आठ नगरसेवकांनी अद्यापही हे प्रमाणपत्र सादर केले नाही़ महापालिका निवडणूक होवून सहा महिन्यांचा कालावधी आता संपत आला आहे़
याबाबत वारंवार सूचना देवूनही आठ नगरसेवकांनी अद्यापपर्यंत मनपा प्रशासनाकडे जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले़ या सर्व नगरसेवकांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता ११ एप्रिलची अंतिम मुदत देण्यात आली असल्याचे देशमुख म्हणाले़
या मुदतीत नगरसेवकांनी प्रमाणपत्र सादर न केल्यास १२ एप्रिल रोजी तसा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे़ या आठ नगरसेवकांमध्ये सुनंदा पाटील, सरिता बिरकले, शैलजा स्वामी, राजेश यन्नम, दुष्यंत सोनाळे, अल्का शहाणे, शोएब हुसेन, शांता गोरे या आठ जणांचा समावेश आहे़ सध्यातरी या नगरसेवकांवर पद जाण्याची टांगती तलवार कायम आहे़