नांदेड- घरगुती वादातून एका महिलेचा कत्तीने वार करुन खून केल्याची घटना मुखेड तालुक्यातील निमजगा तांडा येथे घडली आहे. 20 नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेतील महिलेचा उपचारादरम्यान नांदेडच्या शासकीय रूग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाने दिलेल्या तक्रारीवरून मुक्रमाबाद ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुखेड तालुक्यातील निमजगा तांडा येथे 20 नोव्हेंबर रोजी जिजाबाई हरिचंद्र राठोड(वय 55) या महिलेशी पती हरिचंद्र राठोडने घरगुती कारणावरून वाद घातला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापलेल्या हरिचंद्र राठोडने जिजाबाई यांच्या तोंडावर, पोटावर कत्तीने वार केले.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जिजाबाई यांना उपचारासाठी विष्णूपुरी येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलगा तानाजी राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पिता हरिचंद्र राठोडविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे करीत आहेत.
विवाहितेला औषध पाजून मारण्याचा प्रयत्नअन्य एका घटनेत कंधार तालुक्यातील शेकापूर येथे एका विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून विषारी तणनाशक पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेकापूर येथे 19 नोव्हेंबर रोजी ज्योती मारोती मुंडे ही 20 वर्षीय विवाहिता आपल्या घरी असताना आरोपीने मारहाण करीत जबरदस्तीने तणनाशक पाजवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी विवाहिता ज्योती मुंडे यांच्या तक्रारीवरून कंधार ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.