नांदेड : शहरातील मालमत्ता धारकांकडून आगामी चार महिन्यांत १४० कोटींच्या करवसुलीचा डोंगर उभा असतानाही मनपाच्या कर वसुली कर्मचा-यांकडून हलगर्जी होत असल्याचा ठपका ठेवत १८ वसुली लिपिकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. यावरही कर वसुलीचे प्रमाण न वाढवल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा त्यांना इशारा देण्यात आला आहे.
महापालिका हद्दीत १ लाख ११ हजार मालमत्ताधारक आहेत. चालू आर्थिक वर्षात १५८ कोटींचे वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यातील १३ कोटी ६० लाखांची करवसुली मनपाने नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत पूर्ण केली आहे. उर्वरित कालावधीत जवळपास १४० कोटींच्या करवसुलीचे आव्हान आहे. करवसुलीचा हा डोंगर असताना जवळपास १८ कर वसुली लिपिकांच्या वसुलीचे प्रमाण हे ५ टक्क्यांहून कमीच आढळले आहे. परिणामी अशा कर वसुली लिपिकांवर कामात हयगय व निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात येवून त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसा मिळताच २४ तासांच्या आत खुलासा करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. त्याचवेळी आगामी कालावधीत कर वसुलीचे प्रमाण न वाढल्यास शिस्तभंगाईचा कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला. त्यामुळे कर वसुली लिपिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेल्या कर वसुलीकडे आयुक्तांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ६ नोव्हेंबरपासून शहरात कर वसुलीची विशेष मोहीमही हाती घेण्यात आली आहे. या विशेष कर वसुली मोहिमेत शास्ती माफीची योजनाही लागू केली आहे. या योजनेला शहरवासियांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. १ ते २० नोव्हेंबर या कालावधीत २ कोटी ६३ लाखांची करवसुली महापालिकेने केली आहे. या वसुलीतूनच शहरातील आगामी कालावधीत विकासकामे पूर्ण केली जाणार आहेत. त्याचवेळी मागील अनेक वर्षांपासूनची थकित देयकेही अदा करण्याचा प्रयत्न मनपाकडून केला जात आहे. त्यामुळे वसुली कमी राहणा-या कर्मचा-यांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेला मिळणा-या अनेक योजनांचे अनुदान सध्या शासनस्तरावरुन बंद असल्याने महापालिकेची जणू आर्थिक कोंडीच झाली आहे. या स्थितीत मनपाला कर वसुली या प्रमुख स्त्रोतावरच अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
पाणी कराचे १ कोटी २० लाख वसूलशहरात असलेल्या ५५ हजार ३४७ नळधारकांकडे नेमकी किती पाणीपट्टी थकित आहे याचा आकडा मनपाला सापडला नसला तरी नोव्हेंबर १७ मध्ये १ कोटी १९ लाखांची पाणीकर वसुली पूर्ण झाली आहे. शहरात असलेल्या नळधारकांना मनपाने मागील दोन वर्षे पाणीकराची मागणीच केली नव्हती. सॉफ्टवेअरमधील बिघाडाचे कारण त्यासाठी सांगितले जात असले तरीही आता मनपाने पाणीबिल तयार केले आहे. ही पाणी देयके नळधारकांना वाटप करुन त्यांच्याकडून पाणीपट्टीची मागणी केली जाणार आहेत. यातही आता नेमकी किती पाणीपट्टीची मागणी केली जाते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.शहरातील अनेक नळधारकांना पाणीपट्टी भरुनही शास्ती आकारण्यात आल्याचे प्रकार पुढे आले आहेत.