नांदेड : शहरातील भाग्यलक्ष्मी सुपर मार्केट येथून एका व्यापाऱ्याची ३ लाख २८ हजार रुपयांची दागिने असलेली बॅग चोरट्याने लंपास केली होती़ या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत़ या आरोपींची मोठी टोळीच कार्यरत असून त्यांचे नेटवर्क पुण्यातही आहे़ याबाबत नांदेड पोलिसांनी पुणे पोलिसांना माहिती कळविली आहे़ आरोपीकडून चोरीतील दागिन्यांसह नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
चंद्रकांत चिंतावार यांनी दसऱ्यानिमित्त घरी पुजा करण्यासाठी बँकेच्या लॉकरमधील दागिने काढले होते़ त्यानंतर हे दागिने एका बॅगमध्ये ठेवून श्रीनगर भागातील भाग्यलक्ष्मी सुपर मार्केट येथे गेले होते़ या ठिकाणी काऊंटरवर दागिन्यांची बॅग ठेवून ते सामान खरेदी करीत होते़ त्याचवेळी चोरट्याने दागिन्यांची ही बॅग लंपास केली़ हा सर्व प्रकार सुपर मार्केटमधील सीसी टिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता़ या प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस आरोपीच्या मागावर होते.
हा आरोपी नांदेडात असल्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी स्थागुशाच्या पथकाला आरोपीच्या अटकेचे आदेश दिले़ पथकाने काही वेळातच विलास दिगांबर पांचाळ रा़इकळीमोर याच्या मुसक्या आवळल्या़ या आरोपीकडून पोलिसांनी चोरीतील ३ लाख २८ हजार रुपयांचे दागिने, १ लाख ८० हजार रुपये रोख, चार लाखांच्या दोन गाड्या, २ मोबाईल असा एकुण १२ लाख २८ हजार ४०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ पोनि़सुनिल निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सदानंद वाघमारे, विनायक शेळके, पिराजी गायकवाड, भानूदास वडजे, संग्राम केंद्रे, दारासिंग राठोड, राजू पुल्लेवार, शिंदे यांनी ही कारवाई केली़
आरोपीचे नेटवर्क पुण्यातही
आरोपी पांचाळ याच्यासोबत इतर साथीदार आहेत़ या टोळीने पुण्यातही चोऱ्या केल्या आहेत़ त्यामुळे नांदेड पोलिसांनी आरोपी पांचाळच्या अटकेबाबत पुणे पोलिसांना माहिती दिली़ या टोळीतील पांचाळच्या इतर साथीदारांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली़