नांदेड : शहरातील शासकीय आणि खाजगी जमिनींच्या खासरापत्रक आणि इतर कागदपत्रांत खाडाखोड करुन कोट्यवधी रुपयांच्या जमिनी हडप करण्यात आल्या होत्या. या प्रकरणात तक्रारीनंतर अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंगळवारी दोन तास सुनावणी घेतली. येत्या काही दिवसांत या चौकशीचा अहवाल येणार आहे.
नांदेड शहरातील वाडी बु. यासह तुप्पा, वाजेगाव, सांगवी, मौजे मुदखेड या ठिकाणच्या खाजगी आणि शासकीय जमिनींच्या खासरापत्रकात खाडाखोड करण्यात आली हाेती. त्यासाठी तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरण्यात आले होते. या प्रकरणात सुरुवातीला उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी चौकशी करुन हा यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर हे प्रकरण विभागीय आयुक्तांकडे गेले होते.
विभागीय आयुक्तांनी अति महत्वाचे प्रकरण म्हणून याची नोंद केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीणसिंह परेदशी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती चौकशीसाठी स्थापन केली होती. या समितीपुढे मंगळवारी सुनावणी घेण्यात आली. तब्बल दोन तास ही सुनावणी सुरु होती. सुनावणीनंतर येत्या काही दिवसांत या प्रकरणाचा अहवाल येणार आहे. या अहवालात नेमके काय आहे, याबाबत आता उत्सुकता लागली आहे.