अर्धापूर ( नांदेड ) : राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धापूर वळण रस्त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा कळमनुरीकडे जात असतांना खड्डेमय रस्त्यात ताफा अडकला. प्रशासनाचे ढिसाळ नियोजन व गुत्तेदाराचा हलगर्जीपणामुळे २ किलोमीटरचा रस्ता पार करण्यासाठी २५ ते ३० मिनिटांचा वेळ लागला. ताफा अडकल्याने अधिकाऱ्यांची धांदल उडाल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनांदेड आणि हिंगोली दौऱ्यावर आले आहेत. नांदेडचा कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री हिंगोलीकडे अर्धापूर वळण रस्त्याने निघाले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा ताफा सायंकाळी सहाच्या सुमारास खड्डेमय रस्त्यात अडकला. अचानक उद्भवलेल्या समस्येने प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. या ताफ्यात खासदार हेमंत पाटील, आ. बालाजी कल्याणकर, माजी मंत्री संजय राठोड आदींचा समावेश होता. शेवटी खड्ड्यातून कसा तरी मार्ग काढत ताफा अर्ध्यातासाने पुढे निघाला. दोन किमीच्या अंतर पार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अर्धातास लागल्याने ताफ्याचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांसह रस्त्याचे काम करणाऱ्या गुत्तेदाराची धाकधूक वाढली आहे.
गुत्तेदाराच्या हलगर्जीपणाचा फटकारस्त्याच्या कामाचे साहित्य ठेवण्यासाठी गुत्तेदाराने चक्क राष्ट्रीय महामार्गच निवडला. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विविध कामाचे साहित्य ठेवण्यात आले आहे. याचा फटका इतर वाहन चालकाबरोबर मुख्यमंत्र्याच्या ताफ्यालाही बसला. नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून नाहक त्रास होत असून महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी मूग गिळून गप्प का.? असा सवाल सामान्य जनतेतून होत आहे.