सुनील चौरे हदगाव (जि. नांदेड) : मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्याने तालुक्यातील २५ गावांचा संपर्क तुटला आहे. रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने शहरात दूध पुरवठा करणाऱ्या दुग्ध व्यावसायिकांची अडचण झाली आहे. मात्र, गुरफळी येथील युवक रोज पोहत नदी पार करत दूध पुरवठा करत आहेत.
गुरफळी येथील नदीला पूर येऊन गावाला पाण्याचा वेढा पडत असल्याने या गावाचे पुनर्वसन झाले आहे. परंतु काही लोकांची शेती नदीपलीकडील विदर्भ शिवारात आहे. गेल्या तीन पिढ्यांपासून या गावातील शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. दररोज १० किमी अंतर चालत जात हदगाव शहरात दूध पुरवठा करतात. तीन वर्षापूर्वी बेलमंडळ गावात डेअरी सुरू झाल्याने पायी प्रवास कमी होऊन दोन किमी झाला आहे. मात्र, पावसाळ्यात नदीला पूर येत असल्याने पोहतच नदीपात्र ओलांडावे लागते.
दररोजची जीवघेणी कसरत थांबविण्यासाठी एक होडी खरेदी करण्यात आली होती. मात्र, चालकाचा मृत्यू झाल्याने होडी नदीकिनारीच आहे. त्यामुळे रोज किमान अर्धातास पोहत नदी पार करण्याशिवाय पर्याय नाही.
कौतुक नको, पूल हवानदीपार करत शहरात दूध पोहोचविणाऱ्या या धाडसी युवकांचा व्हीडिओ समाजमाध्यमात ‘व्हायरल’ होताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र, कौतुक नको, या नदीवर पूल बांधून देण्यासाठी सरकारला आवाहन करा, अशी विनंती गावकऱ्यांनी केली आहे.
या जिद्दीला सलाम! गुरफळी गावातील दहा युवक पोटाला दुधाची किटली बांधून अर्धा तास पोहत नदीपात्र पार करतात. नदीपात्र खूप खोल असल्याने एकमेकांना आधार देत रोज ही जीवघेणी कसरत करावी लागते. भरपावसात देखील त्यांच्या ‘जलदिंडी’ला खंड पडलेला नाही, हे विशेष!