नांदेड - स्थानिक सिडकाे परिसरातील वात्सल्यनगर साेसायटीत गुरुवारी भरदिवसा किराणा व्यापाऱ्याच्या घरातून चाकूच्या धाकावर ३० लाख रुपये किमतीचा ऐवज लुटण्यात आला. या घटनेतील लुटारू सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पाेलिसांनी संशयावरून दाेघांना ताब्यात घेतले असून, त्यातील एक काैटुंबिक सदस्यच असल्याचेही पाेलिसांकडून सांगण्यात आले.
नांदेड ग्रामीण पाेलीस ठाण्याच्या हद्दीत वात्सल्यनगर येथे किराणा व्यापारी गाेविंदराज रमेश दाचावार यांचे घर आहे. गुरुवारी दुपारी त्यांच्या घरात कुणीही पुरुष मंडळी नसल्याचा डाव साधून तीन चोरट्यांनी प्रवेश केला. यावेळी घरात असलेल्या गोविंदराज यांच्या पत्नीला चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवित घरात असलेल्या दीड वर्षाच्या बाळाला जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेल्या ४ लाखांच्या रोख रकमेसह ५० तोळे सोन्याचे दागिने आणि अर्धा किलो चांदी असा जवळपास ३० ते ३५ लाखांचा ऐवज लुटून नेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले, उपनिरीक्षक आनंद बिचेवार आदींनी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली. परिसरात नाकाबंदी करीत चोरट्यांचा शोध सुरू केला. या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असून ताब्यात घेतलेला एक जण दाचावारचा चुलत भाऊ असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
चौकट....
मास्टर माइंड चुलत भाऊच ?
सिडकोतील या जबरी चोरीच्या घटनेतील मास्टर माइंड हा गोविंदराज दाचावार यांचा चुलत भाऊ श्रीनिवास दिलीपराव दाचावार (वय २५) हाच असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तो चोरी झालेल्या घराच्या तळमजल्यावर राहतो. गोविंदराज दाचावार हे दुसऱ्या मजल्यावर राहतात. त्यांच्या घरी कुणीही पुरुष नसल्याची माहिती त्यानेच दिली असावी, असा संशय पाेलीस निरीक्षक अशाेक घाेरबांड यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना व्यक्त केला.