नवीन नांदेड: सद्यस्थितीत जिल्ह्यात झपाट्याने सुरू असलेल्या 'कोरोना'विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड येथील 'आरटीओ' अर्थात प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालय सात एप्रिल पासून ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. नांदेडच्या 'एमआयडीसी' परिक्षेत्रातील प्रादेशिक परिवहन कार्यालय येत्या ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याने 'केंद्र' शासनाकडून 'वाहन'विषयक व 'अनुज्ञप्ती'विषयक कागदपत्रांची 'वैधता' येत्या ३० जूनपर्यंत वाढविलेली आहे.
नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये, यास्तव प्रतिबंधात्मक तथा खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश जारी केले आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिकाऊ अनुज्ञप्ती तथा 'लर्निंग' लायसन्स, पक्की अनुज्ञप्ती चाचणी अर्थातच 'परमनंट' लायसेन्सची टेस्ट आदी कार्यालयीन कामकाज नियंत्रित केले, तरी गर्दी रोखणे सद्याच्या परिस्थितीत शक्य होत नाही. दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलेले असून, त्यानुसार पाचपेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरण्यास तथा एकत्र जमा होण्यास प्रतिबंधीत करण्यात आले आहे.
विशेष बाब म्हणजे, 'आरटीओ' कार्यालयात दैनंदिन कामकाजासाठी येणाऱ्या अर्जदारांची संख्या खूपच अधिक असल्याने उपरोल्लेखित जमावबंदी आदेशाचेही उल्लंघन होत असल्याचे परिवहन अधिकारी यांच्या निदर्शनास आले आहे. याशिवाय, सद्यपरिस्थितीत नांदेडच्या 'आरटीओ' कार्यालयात कार्यरत असलेले सुमारे २० अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांना 'कोरोना'ची लागण झाली असल्याने कार्यालयातील कामकाज प्रभावित झाले आहे. या परिस्थितीस वेळीच प्रतिबंध नाही केल्यास, कार्यालयातील उर्वरित अधिकारी तथा कर्मचारी यांनाही संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. महत्वपूर्ण बाब म्हणजे, प्रस्तुत कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांचा कोरोनापासून बचाव नाही झाल्यास भविष्यातील कार्यालयीन कामकाजावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता संभवते.
त्याचवेळी, मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मुंबई तसेच अपर परिवहन आयुक्त, म. रा. मुंबई, आणि नांदेड येथील जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचेनुसार व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ७ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालयातील खटला विभाग व आस्थापना विभाग वगळता कार्यालयातील संपूर्ण दैनंदिन कामकाज बंद करण्यात येत आहे. दरम्यान, केंद्र शासनाने वाहनविषयक, अनुज्ञप्ती विषयक कागदपत्रांची वैधता ३० जूनपर्यंत वाढविलेली आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, उपरोल्लेखित कालावधीत ज्यांनी शिकाऊ (लर्निंग) व पक्की (परमनंट लायसेन्स) अनुज्ञप्तीसाठी अपॉईंटमेंट घेतल्या आहे, त्यांनी त्या अपॉईंटमेंट रद्द करून आपले सोईप्रमाणे पुन्हा नवीन अपॉईंटमेंट घ्याव्यात. जुनी अपॉईंटमेंट रद्द करणे व पुन्हा नवीन अपॉईंटमेंट घेणे,ही प्रक्रिया ऑनलाईन असून, त्याकरिता पुन्हा कोणतेही 'अतिरिक्त शुल्क' आकारले जात नाही. ३० एप्रिलनंतर कार्यालय तत्कालीन शासननिर्णयाप्रमाणे कार्यरत असेल, याची सर्व संबंधितांनी व अर्जदारांनी नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.