नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाकडून विभागात दररोज २७ रेल्वे चालविण्यात येतात़, परंतु मागील काही दिवसांपासून रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे़ एकही रेल्वे आपल्या ठरलेल्या वेळेत धावत नसल्याने रेल्वे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मराठवाड्यातील रेल्वे समस्या सोडविण्याच्या उद्देशाने २००३ मध्ये नांदेड विभागीय रेल्वे कार्यालयाची स्थापना करण्यात आली़ यानंतर रेल्वे प्रवाशांना दर्जेदार आणि चांगल्या सुविधा देण्याची जबाबदारी नांदेड विभागीय कार्यालयावर टाकण्यात आली़, परंतु रेल्वे प्रशासनाने नांदेड विभागातील प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते़ सध्या नांदेड विभागाकडून नांदेड रेल्वे स्थानकावरून २७ रेल्वेगाड्या चालविण्यात येतात़ यामध्ये नांदेड-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस, नांदेड- संतरागछी सुपरफास्ट एक्स्प्रेस, नांदेड- उना सुपरफास्ट एक्स्प्रेस, नांदेड-अमृतसर सचखंड सुपरफास्ट एक्स्प्रेस यासह १३ एक्स्प्रेस आणि दहा पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे़
नांदेड येथून सोडण्यात येणार्या या गाड्या वेळेवर चालविण्याची जबाबदारी नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाची आहे़ काही महिन्यांपूर्वी नांदेड विभागाने रेल्वेगाड्या वेळेत चालवत दक्षिण मध्य रेल्वेमध्ये दुसरा क्रमांक पटकावला होता़, परंतु तेव्हापासून आजपर्यंत नांदेड विभागातून एकही रेल्वे वेळेत धावत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ काही गाड्या तर दररोज निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत़ यात नांदेड - निजामाबाद पॅसेंजर, नांदेड -पनवेल एक्स्प्रेस, नांदेड-दौंड पॅसेंजर, नांदेड-मनमाड पॅसेंजर, नांदेड-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस, नांदेड-हैदराबाद, परभणी-नांदेड पॅसेंजरचा समावेश आहे़ सदर गाड्या वेळेवर धावत नसल्याने प्रवाशांत नाराजीचा सूर आहे़ नांदेड- मनमाड पॅसेंजर, नांदेड - पनवेल एक्स्प्रेस आणि नांदेड - दौंड पॅसेंजर आपल्या निर्धारित वेळेपेक्षा अर्धा ते एक तास उशिराने सोडली जात आहे़ मागील पंधरा दिवसांत सदर गाड्यांपैकी एकही गाडी वेळेवर सुटलेली नाही़
अप-डाऊन करणार्या कर्मचार्यांची गोचीपरभणी येथून नांदेड येणार्या प्रवाशांकरिता दमरेने परभणी-नांदेड पॅसेंजर उपलब्ध करून दिली आहे़, परंतु सकाळी साडेनऊ वाजता परभणी येथून सुटणारी ही गाडी नांदेड येथे दुपारी दोन वाजता तर कधी अडीच वाजता पोहोचत आहे़ ५६ किलोमीटर प्रवास करण्यासाठी चार ते पाच तास लागत आहेत़ या पॅसेंजरमध्ये बहुतांश अधिकारी, कर्मचारी प्रवास करतात़ गाडी कार्यालयीन वेळेत पोहोचत नसल्याने कर्मचार्यांची गोची होत असून त्यामुळे ते बसचा प्रवास पसंत करीत आहेत़ अप-डाऊन करणार्या कर्मचार्यांमध्ये परभणी येथून पूर्णा, चुडावा, लिंबगाव, नांदेडचे कर्मचारी अधिक आहेत़
शिर्डी जाणार्या प्रवाशांची नाराजीनांदेड - दौंड पॅसेंजर गाडीने कोपरगाव येथे उतरून शिर्डी जाणार्या प्रवाशांची संख्या अधिक आहे़ परंतु, दौंड पॅसेंजर निर्धारित वेळेपेक्षा एक ते दोन तास उशिराने धावत असल्याने ती कोपरगाव येथे उशिरा पोहोचत आहे़
मराठवाडा एक्स्प्रेसही लेटलतीफऔरंगाबादहून मराठवाडा एक्स्प्रेस वेळेवर सुटते, परंतु त्यानंतर पूर्णा येथून पुढे नांदेडपर्यंतचे अंतर कापण्यासाठी एक ते दीड तासांचा वेळ घेतला जातो़ त्यामुळे ही गाडी रात्री साडेअकरा वाजता नांदेडला पोहोचते़