नांदेड : जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी जलद सायकल चालवण्याचा विक्रम प्रस्थापित केला असून त्यांनी १९ तासात ३०० कि.मी. चे अंतर पार केले आहे. फ्रान्सच्या द ओडॅक्स इंडिया रॅन्डोनर्सतर्फे नांदेड - हैद्राबाद महामार्गावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत त्यांनी हि कामगिरी केली.
फ्रान्सच्या द ओडॅक्स इंडिया रॅन्डोनर्सतर्फे नांदेड - हैद्राबाद महामार्गावर शनिवारी आयोजित सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या ब्रेव्हेटमध्ये ३०० कि.मी.ची बीआरएम स्पर्धा वेणीकर यांनी पूर्ण केली. स्पर्धे दरम्यान, नांदेड - नरसी - देगलूर - पिटलम (तेलंगणा) व परत याच मार्गे परत नांदेड हे ३०० कि.मी. चे अंतर त्यांनी १९ तासात पूर्ण केले. या स्पर्धे दरम्यान नांदेड - हैद्राबाद रस्त्यावर मुसळधार पाऊस सुरू होता. अशा पावसातही त्यांनी सायकलींग करत हे अंतर पार करत विक्रम प्रस्थापित केला.
यापूर्वीही वेणीकर यांनी मुंबई ते गोवा, मनाली ते लेह, केरळ, दक्षिण भारत तसेच मराठवाड्यातील परळी येथे मागील वर्षी झालेल्या सायकलींग स्पर्धेत सहभाग नोंदवून प्राविण्य मिळविले आहे. वेणीकर यांनी सायकलींचा छंद लहानपणापासूनच जोपासला आहे, यामुळे आता नांदेड महसूल विभागातील इतर अधिकारी, कर्मचारी सुद्धा सायकलींगकडे आकर्षित झाले आहेत.