दिनांक २७ मार्च रोजी सकाळीच नांदेड तहसील कार्यालयाचे पथक जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किरण अंबेकर, नायब तहसीलदार महसूल मुगाजी काकडे यांच्यासोबत गोवर्धन घाट व कौठा नदीपात्रात दाखल झाले.
नदीच्या दोन्ही बाजूने २ वेगवेगळी पथके बोटीसह नदीत दाखल झाली. यावेळी पथकात कर्मचारी व पुरेसा पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कारवाईला लगेचच सुरुवात झाली. या पथकाने केलेल्या कारवाईत गोवर्धन घाट व उर्वशी घाट येथे ६३ तराफे, कौठा येथे १४ तराफे असे एकूण ७७ तराफे मजुरांच्या सहाय्याने जाळून नष्ट केले. दोन्ही बाजूने वेगवेगळी पथके व नदीमध्ये बोटीवर १ फिरते पथक असल्यामुळे तराफे पळवून नेता आले नाहीत.
या कारवाईत तहसीलदार किरण अंबेकर, नायब तहसीलदार महसूल मुगाजी काकडे, मंडल अधिकारी खुशाल घुगे, चंद्रशेखर सहारे, अनिल धुळगंडे, गजानन नांदेडकर, कोंडिबा नागरवाड व अनिरुद्ध जोंधळे तसेच तलाठी मनोज देवणे, संताजी देवापूरकर, ईश्वर मंडगीलवार, मंगेश वांगीकर, उमाकांत भांगे व आकाश कांबळे यांनी सहभाग घेतला.
या कारवाईवेळी वजिराबाद पोलीस स्थानक, नांदेड ग्रामीणच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. महसूल पथक जरी कोरोना, निवडणुकीच्या कामात व्यस्त असले, तरी वाळूच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर लक्ष ठेवून आहे. वाळू माफियांवर वेळोवळी फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार अंबेकर यांनी सांगितले.