लोहा / माळेगाव : श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेसाठी येणार्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळ नांदेड विभागाच्या वतीने जवळपास ११० बसची दिवसरात्र सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रेला नांदेड जिल्ह्यासह इतर राज्यांतूनही अनेक भाविक खंडेरायाच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांना प्रवासामध्ये गैरसोय होवू नये, यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन नांदेड विभागाच्या वतीने विशेष बसेस सोडण्यात आल्या आहेत. यात नांदेड आगाराच्या २५ बसेसचा समावेश असून भोकर- १०, मुखेड- १८, देगलूर-१७, कंधार- २५, हदगाव ५ तर बिलोली आगाराच्या १० अशा एकूण ११० जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत.
विभाग नियंत्रक ए. आर. कचरे यांच्या मार्गदर्शनात विभागीय वाहतूक अधिकारी पी. एस. नेहूल यात्रेकरुंच्या प्रवास सुविधेसाठी नियोजन करीत आहेत. कंधार बसस्थानकाचे आगार प्रमुख एच. एम. ठाकूर यांना माळेगाव यात्रेची प्रमुख जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वाहतूक नियंत्रक पी. ए. तुंबफळे व एम.एल. गायकवाड हे कामकाज पाहत आहेत. याठिकाणी इतर दहा कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सकाळी ६ ते दुपारी २, दुपारी २ ते रात्री दहा आणि रात्री दहा ते सकाळी सहा अशा तीन सिफ्टमध्ये कर्मचार्यांच्या ड्यूट्या लावण्यात आल्या आहेत. मागच्यावर्षी शंभर जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या, यावर्षी ११० सोडण्यात आल्या आहेत. गतवर्षी यात्रेच्या माध्यमातून नांदेड विभागाला ५० लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. यावर्षी ६० लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. जादा बसेस सोडल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
फिरत्या शौचालयाची यात्रेत व्यवस्था
माळेगाव यात्रेत भाविकांच्या सोयीसाठी फिरत्या शौचालयाची सुविधा करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा यात्रा सचिव व्ही. आर. कोंडेकर यांनी दिली. ग्रामपंचायतीच्या वतीने चार ठिकाणी सामूहिक शौचालयाची सुविधा करण्यात आली असून पहिल्यांदाच फिरत्या शौचालयाचे चार संच उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. कुस्त्याचे मैदान, बसस्थानक परिसर, स्टॉल परिसर तसेच घोडा व गाढव बाजार परिसरात हे फिरते शौचालय ठेवण्यात आले आहेत. या शौचालयाजवळ पाण्याचे टँकर ठेवण्यात आले आहेत. या शौचालयाचा वापर करण्यासाठी भाविकांमध्ये जनजागृती केली जात आहे. यासाठी लोहा पंचायत समितीचे कर्मचारी काम पाहत असल्याची माहिती गटविकास अधिकारी फांजेवाड यांनी दिली.