नांदेड : ज्या महामानवाने पुस्तकासाठी स्वतंत्र घर बांधले,ज्यांनी या देशाची घटना लिहली, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुष्याच्या शेवट पर्यंत विद्यार्थी म्हणूनच जगले. अशा ज्ञानाच्या महासागरास नांदेड येथील नागरिकांनी पुस्तक रुपी आदरांजली अर्पण केली. नव्या पिढीला वाचनाची प्रेरणा मिळावी या उद्देशाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राला बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून नागरिक व कर्मचा-यांच्या योगदानातून १० हजार पुस्तकांसह इतर उपयोगी साहित्य उपलब्ध झाले.
विद्यापीठामध्ये २०१० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र सुरु करण्यात आले़ केंद्र स्थापन झाल्यानंतर या विभागाला स्वतंत्र जागा नव्हती़ मात्र डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त या केंद्राचा विस्तार करण्याची विनंती कर्मचा-यांसह अभ्यासकांनी कुलगुरुकडे केल्यानंतर विभागाला स्वतंत्र मान्यता देत़ कुलगुरुंनी जागाही उपलब्ध करुन दिली़ आणि येथुनच या अभ्यास केंद्राचा प्रवास सुरु झाला.
लोकसहभागातून मिळाली बळकटी जागा आणि केबीन विद्यापीठाकडून मिळाले तरी इतर पायाभूत सुविधा कशा उभ्या करायच्या असा प्रश्न या केंद्राचे प्रमुख पी़विठ्ठल यांच्या पुढे उभा होता़ विठ्ठल यांनी केंद्र अधिक सुसज्ज करण्यासाठी लोकसहभागाची मदत घेण्याचे निश्चित केले़ आणि त्यांच्या या आवाहनाला केंद्रातीलच कर्मचा-यांकडून पहिला प्रतिसाद लाभला़ विद्यापीठात रोजंदारीवर काम करणा-या १९ महिला कर्मचा-यांनी प्रत्येकी ३५० ते ५०० रुपये असा निधी देऊन या केंद्रासाठी खुर्च्या उपलब्ध करुन दिल्या़ त्यानंतर इतर कर्मचा-यांसह शहरातील नागरिकांनीही अध्यासन केंद्रासाठी मदत देण्यास सुरुवात केली़ अशा लोकसहभागातूनच आता या केंद्राकडे मॅट, खुर्च्या, पडदे, डायससह, सीसीटीव्ही कॅमे-याचीही सुविधा प्राप्त झाली आहे़ एवढेच नव्हे तर केंद्रातील अभ्यासीकेमध्ये सर्व दैनिकांबरोबरच मासिकेही उपलब्ध करुन देण्यात आली असूऩ यासाठीही लोकवर्गणी लाभल्याचे समन्वयक पी़विठ्ठल यांनी सांगितले.
अध्यासन केंद्रातील सुनिल राहुळे, सुनिल ढाळे, काळबा हानवते, माधव जायभाये, संदीप एडके आदींच्या सहकार्याने केंद्रातर्फे व्याख्यानमालेसह संदर्भ ग्रंथालय, ई-रिसोर्सेस, चर्चासत्र, कार्यशााळा आदी उपक्रमही मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले़ लोकसहभागातून पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्याने़ अध्यासन केंद्रातर्फे राबविण्यात येत असलेल्या १ वर्षाच्या ‘सर्टिफिकेट कोर्स इन फुले आंबेडकर थॉट’ या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही याचा लाभ होत आहे़ माजी कुलगुरु डॉ़ नागनाथ कोत्तापल्ले यांनी नुकतीच या अध्यासन केंद्राला भेट दिली असता़ या उपक्रमासोबतच लोकसहभागाचे त्यांनी कौतुक केले़
केंद्राचे सव्वा लाख पुस्तकांचे उद्दीष्टडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अध्यासन केंद्रातील कर्मचा-यांनी विविध विषयांवरील १ लाख २५ हजार पुस्तके केंद्रात उपलब्ध करुन देण्याचे लक्ष ठेवले आहे़ या अनुषंगाने समाजातील अनेकांना अध्यासन केंद्राला पुस्तके भेट द्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे़ या आवाहनालाही नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असूऩ सुमारे १० हजारांवर पुस्तके विविध स्तरातील नागरिकांनी केंद्राला भेट म्हणुन दिली आहेत़ या पुस्तकांचा विद्यार्थ्यांसह अभ्यासकांनाही फायदा होणार आहे.