नांदेडच्या महापौर मोहिनी येवणकर यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 14:08 IST2021-09-30T14:07:30+5:302021-09-30T14:08:55+5:30
नांदेडचे महापौर हे ओबीसी प्रवर्गातील महिलासाठी राखीव आहे.

नांदेडच्या महापौर मोहिनी येवणकर यांचा राजीनामा
नांदेड : नांदेडच्या काँग्रेस महापौर मोहिनी येवनकर यांनी आपल्या पदाचा आज गुरुवारी राजीनामा दिला. अडीच वर्षाच्या कालावधीत दोन महापौर करण्याच्या धोरणानुसार महापौर येवनकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा सर्वसाधारण सभेत दिला.
नांदेडचे महापौर हे ओबीसी प्रवर्गातील महिलासाठी राखीव आहे. पहिल्या सव्वा वर्षाच्या कालावधीत काँग्रेसने मोहिनी येवनकर यांना संधी दिली. येवनकर यांचा कालावधी कोरोना कार्यकाळातच संपला. पहिल्या टप्प्यातच इच्छुक असलेल्या जयश्री पावडे यांना आता काँग्रेस पक्षाकडून संधी दिली जाईल, असे सांगितले जात आहे. काँग्रेस पक्षाने आता उपमहापौर मसूद अहमद खान यांना पुन्हा संधी दिली की नाही हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. गुरुवारी झालेल्या ऑनलाइन सभेत तीन प्रस्ताव ठेवले होते. मात्र सभेच्या प्रारंभीच मोहिनी येवनकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. काँग्रेस पक्षाचे नेते अशोकराव चव्हाण यांनी आपल्याला महापौर पदावर कार्य करण्याची संधी दिली याबद्दल आभार व्यक्त केले. महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी कर्मचाऱ्यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले.
जयश्री पावडेंना मिळणार संधी!
आगामी काळातील सार्वत्रिक निवडणुका पाहता काँग्रेस जयश्री पावडे यांना संधी देईल, असे मानले जात आहे. अभ्यासू आणि आक्रमक नगरसेविका म्हणून पावडे यांची ओळख आहे. जयश्री पावडे यांनी मनपात महिला बालकल्याण समितीचे सभापती पदही भूषविले आहे.