नांदेड : बुधवारी पहाटे सव्वा सात वाजेच्या सुमारास नांदेड सह परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील रामेश्वर तांडा असून भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केलवर ४.५ एवढी नोंद झाली आहे. भूकंपाच्या धक्क्यांनी घाबरून नागरिक रस्त्यावर आले होते.
मराठवाड्यातील नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात १० जुलै रोजी सकाळी ७.१४ वाजता भूकंपाचे हादरे बसले आहेत. नांदेड शहरातील श्रीनगर, भाग्यनगर, आनंद नगर, तरोडा नाका, सिडको - हडको, जुना नांदेड आदी भागात धक्के जाणवले. जमीन हादरल्याने आणि आवाज आल्याने अनेक जण लेकराबाळासह घराबाहेर पडले. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी होती. पाच रिश्टर स्केलच्या पुढच्या तीव्रतेचे भूकंप हे धोकादायक मानले जातात. त्यात नांदेड व परिसरातील भूकंपाची तीव्रता आता ४.५ रिश्टर स्केलपर्यंत पोहोचली आहे.
नागरिकांनी घाबरू नये, काळजी घ्यावीनांदेडमधील भूकंपाची तीव्रता सौम्य स्वरूपाची असली तरीही नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात आहे. नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झालेली आहे. नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत, त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत.- अभिजीत राऊत जिल्हाधिकारी, नांदेड
चार महिन्यापूर्वी पहाटेच बसले होते धक्के
चार महिन्यापूर्वी 21 मार्च रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास एकापाठोपाठ भूकंपाचे तीन टक्के जाणवले होते. यामध्ये सर्वाधिक मोठा धक्का ४.२ रिश्टर स्केल च्या नोंदीचा होता. मागील भूकंपाचे केंद्रबिंदू देखील हिंगोली जिल्ह्यातील पांग्रा शिंदे गावात दाखवले गेले होते. त्यावेळी गाव खेड्यातील अनेक भिंतींना तडे गेले होते.