नांदेड : रविवारी सायंकाळी जुना मोंढा परिसरात सलग तीन दुकानांवर तब्बल सात गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबाराच्या या थरारनाट्यात एक पान टपरी चालक जखमी झाला असून अवघे नांदेड शहरच हादरून गेले आहे.
शहरातील जुना मोंढा भागात असलेल्या महाराजा रणजितसिंह मार्केटमधील विजय धनवानी यांच्या दुकानात चार जण शिरले. सुरवातीला चाकूचा धाक दाखवून एका ग्राहकाजवळील दहा हजार रुपये त्यांनी काढून घेतले व दुकानाबाहेर जाताना वरच्या दिशेने बंदुकीच्या दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते मंगलमूर्ती गारमेंटमधे गेले. तेथेही त्यांनी दोन गोळ्या झाडल्या. त्यानंर कृष्णा कलेक्शन या दुकानात जाऊन रागाच्या भरात त्यांनी आणखी दोन गोळ्या भिंतीवर झाडल्या.
त्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली आणि यातच पान टपरी चालक आकाश परिहार हाताला गोळी लागून जखमी झाला. अवघ्या दहा मिनिटात आरोपींनी सात गोळ्या झाडून घटनास्थळावरून पळ काढला. घाबरलेल्या व्यापाऱ्यांनी माहिती देताच पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पो. नि. द्वारकादास चिखलीकर यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.