नांदेड : मंगळवारी झालेल्या आंदोलनादरम्यान दंगलीस प्रोत्साहन देणाऱ्या, दगडफेक करणाऱ्याविरोधात पोलिसांनी विविध ठाण्यात ११ गुन्हे दाखल केले असून घटनेचे प्रत्यक्ष फुटेज पाहून यात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे़.
मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी नांदेडसह जिल्हाभरात आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले़ काही ठिकाणी हे आंदोलन हिंसक वळणावर गेल्याने पोलिस तसेच कार्यकर्ते आमने-सामने ठाकले होते़ दरम्यान, या प्रकरणी जिल्ह्यात ११ ठिकाणी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे़ नांदेड शहरात वजिराबाद आणि भाग्यनगर पोलिस ठाण्यात कार्यकर्त्याविरूद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. तर मुखेड, किनवट येथे प्रत्येकी २, उस्माननगर, नांदेड ग्रामीण, कंधार, बारड, नायगाव, किनवट पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दंग्यास चेथावणी देणे, वाहनावर दगडफेक करून नुकसान करणे, बळजबरीने दुकाने बंद करण्यास लावणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, शासकीय कामात अडथळा आणणे यासह इतर कलमानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून यात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांचे अटकसत्र सुरू करण्यात आले आहे.