नांदेड: दिवाळीच्या सलग तीन दिवस सुट्या मिळाल्यानंतरही जिल्हा परिषदेचे कर्मचारी कार्यालयामध्ये वेळेमध्ये हजर राहिले नसल्याचे बुधवारी सकाळी उघड झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी बुधवारी सकाळी १० वाजता विविध विभागांना भेटी दिल्या असता तब्बल २९ कर्मचारी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. या सर्व कर्मचाऱ्यांना आता नोटीस बजावण्यात आली आहे.
राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा केल्याने प्रत्येक शनिवार आणि रविवारी कर्मचाऱ्यांना सुटी मिळत आहे. या आठवड्यात तर रविवारला लागून सोमवार आणि मंगळवारीही दिवाळीची सुट्टी होती. त्यामुळे बुधवारी कार्यालयीन कर्मचारी वेळेत उपस्थित राहतील, असा अंदाज होता. बुधवारी सकाळी १०च्या सुमारास मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर या एका खाजगी गाडीने जिल्हा परिषद मुख्यालयात दाखल झाल्या. कार्यालयात आल्याबरोबर त्यांनी मुख्यालयातील विविध विभागांना भेटी देण्यास सुरुवात केली. त्यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली.
वर्षा ठाकूर यांनी केलेल्या या अचानक पाहणी वेळी बांधकाम दक्षिण विभागाचे तब्बल १४ कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित असल्याचे आढळले. याबरोबरच कृषि विभागाचे ३, समाजकल्याण २, बांधकाम उत्तर विभाग २, आरोग्य विभाग, शिक्षण माध्यमिक विभाग, वित्त विभाग आणि ग्रामपंचायत विभागाचेही प्रत्येकी एक कर्मचारी गैरहजर होते. याबरोबरच लघु पाटबंधारे विभाग आणि महिला व बालकल्याण विभागाचे प्रत्येकी २ कर्मचारी सकाळी १० वाजल्यानंतरही कार्यालयात दाखल झालेले नव्हते. या सर्व २९ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश वर्षा ठाकूर यांनी दिले आहे. दरम्यान, या कार्यवाहीमुळे जिल्हा परिषद मुख्यालयातील लेटलतीफ कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणल्याचे चित्र आहे.
दरम्यान, यापूर्वी जि.प.चे उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी जिल्हा परिषदेतील अनेक विभागांना भेटी देवून पाहणी केली होती. यावेळी अनेक कर्मचारी अनुपस्थित असल्याचे त्यांना आढळून आले. त्यानंतर त्यांनी याबाबत त्यांना नोटिसाही बजाविल्या होत्या. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. दरम्यान, शासनाने कामकाज सुटसुटीत व्हावे आणि कर्मचाऱ्यांवरील ताण कमी व्हावा यासाठी पाच दिवसांचा आठवडा केली. त्यामुळे दोन दिवस सुटी मिळते. परंतु ही सुट्टी लेटलतिफांना पुरेशी होत नसल्याचे दिसून येते.
यापूर्वी कर्मचाऱ्यांना तंबी दिलेलीजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी रुजू झाल्यानंतर काही दिवसातच जिल्हा परिषदेत अशाच प्रकारे अचानक तपासणी केली होती. त्यावेळीही अनेक कर्मचारी लेटलतीफ असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. परंतु त्यावेळी त्यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना यापुढे लेटलतीफपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दात तंबी दिली होती. परंतु त्यानंतरही लेटलतीफ कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळा पाळण्याकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून आले.