लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून येत्या काही दिवसांतच पेट्रोलचा दर सेंच्युरी ठोकण्याची चिन्हे दिसत होती़ यावर नागरिकांच्या संतापाचा भडका उडाल्यानंतर सरकारने पेट्रोलच्या दरात पाच रुपये कमी करण्याची घोषणा केली़ परंतु, प्रत्यक्षात नांदेडला पेट्रोलच्या दरात केवळ ४ रुपये ३५ पैशांचीच सूट मिळत आहे़ त्यामुळे सरकारने केलेली घोषणा फसवी असल्याची भावना नांदेडकरांची झाली आहे़ विशेष म्हणजे, गत दोन महिन्यांत नांदेड शहरात पेट्रोल आणि डिझेल तब्बल ७ रुपयांनी वाढले होते़इंधनाचे दर जुलै महिन्यापासून सातत्याने वाढत आहेत़ गत दोन महिन्यांत नांदेडात मोजके काही दिवस वगळता दररोज काही पैशांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ होत आहे़त्यामुळे पेट्रोलचे दर लवकरच सेंच्युरी ठोकतील, असा अंदाज वर्तविण्यात येत होता़ १ आॅगस्टला नांदेडात पेट्रोल ८५़२८ पैसे तर डिझेल ७२़३९ पैसे प्रतिलिटर होते़ त्यानंतर ३० आॅगस्टला यामध्ये वाढ होवून पेट्रोल ८७़३१ तर डिझेल ७४़६६ रुपयांवर गेले होते़ सप्टेंबर महिन्यातही दरवाढीचा आलेख चढताच होता़ ७ सप्टेंबरला पेट्रोल-८८़९७, डिझेल-७६़८८ रुपयांवर होते़ १४ सप्टेंबरला पेट्रोल-९०़२३, डिझेल-७८़१५ रुपये, २८ सप्टेंबरला पेट्रोल-९२़१३ तर डिझेल ७९़३२ पैशांवर पोहोचले होते़ तर ३० सप्टेंबर रोजी नांदेड शहरात पेट्रोल ९२़३९ तर डिझेल ७९़७० रुपयांवर गेले होते़ पाच रुपये कमी करण्याच्या सरकारच्या घोषणेनंतर शुक्रवारी नांदेड शहरात पेट्रोल ८८़५९ तर डिझेल ७७़८४ पैसे प्रतिलिटर होते़गत दोन महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलमध्ये साधारणत: सात रुपयांनी वाढ झाली होती़ दररोज होणाऱ्या या दरवाढीला सर्वसामान्य नागरिक वैतागून गेला होता़ त्यात सरकारने गुरुवारी राज्यात पेट्रोल पाच रुपयांनी स्वस्त करण्याची घोषणा केली होती़ त्यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली होती़ परंतु, प्रत्यक्षात हे दर पाच रुपयांनी कमी केलेच नसल्याचे पेट्रोल पंपचालकांचे म्हणणे आहे़ शुक्रवारी नांदेडात लिटरमागे फक्त ४ रुपये ३५ पैसे तर डिझेलचे दर २ रुपये ५९ पैशांनी कमी झाले होते़ त्यामुळे पेट्रोलपंपचालकही बुचकाळ्यात पडले़ त्यात शुक्रवारी सकाळपासूनच वाहनधारक आणि पेट्रोलपंप चालकामध्ये या विषयावरुन वादाचे प्रकारही घडले़ दिवसभर सुरु असलेल्या या वादामुळे पेट्रोलपंपचालकही चांगलेच वैतागले होते़ तर सरकारने घोषणा केलेल्या पाच रुपयांतील ६५ पैसे गेले कुठे? असा प्रश्न नागरिकांना पडत होता़ दरम्यान, जुलै ते सप्टेंबर अखेरपर्यंत दोन महिन्यांत सात रुपयांची वाढ झालेली असताना कमी केलेले दर अत्यल्प आहेत़धर्माबादेत पेट्रोल नव्वदीच्या खालीधर्माबाद आणि उमरीमध्ये सर्वाधिक महाग इंधन मिळते़ ३० सप्टेंबर रोजी धर्माबादेत पेट्रोल-९३़५८ तर डिझेल ८०़८३ रुपये प्रतिलिटर होते़ तर उमरीमध्ये पेट्रोल-९३़२८, डिझेल-८०़५४ रुपये होते़ या दोन्ही ठिकाणी मनमाड येथून इंधन पुरवठा करण्यात येतो़ त्यामुळे वाहतुकीचा दर अधिक लागत होता़ सरकारने दर कमी करण्याच्या घोषणेनंतर शुक्रवारी धर्माबादेत पहिल्यांदा पेट्रोलचे दर नव्वदीच्या खाली आले होते़ पेट्रोल ८९़७३ तर डिझेल ७८़९२ रुपये लिटरने विक्री होत होते़दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलणे सुरु झाल्यापासून दररोज सकाळी सहा वाजेपासून नवीन दर लागू करण्यात येतात़ काही ठिकाणी अॅटोमॅटीक मशीन आहेत़ तर कुठे मॅन्यूअली सेटींग करावे लागते़ शुक्रवारी शहराबाहेरील एका पेट्रोल पंपचालकाने सकाळी आठपर्यंत नवीन दराची सेटींग न करता जुन्याच दराने विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला़
नांदेडकरांना ४ रुपये ३५ पैशांचाच दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 12:59 AM