नवीन नांदेड : सायबर सेल सक्षम केल्यानंतर आता सीसीटीएनएस अर्थात क्राईम कंट्रोल ट्रेकींग नेटवर्क सिस्टीम विकसीत करण्यात आली आहे़ त्यामुळे नागरिकांना कोणतीही तक्रार देण्यासाठी आता पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नसून घरबसल्या आॅनलाईन तक्रार करणे सहज शक्य झाले आहे, अशी माहिती विशेष पोलीस महानिरिक्षक चिरंजीव प्रसाद यांनी दिली़
नवीन नांदेड भागातील विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली़ यावेळी विशेष पोलीस महानिरिक्षक चिरंजीव प्रसाद यांनी सीसीटीएनएस या योजनेची सविस्तर माहिती दिली़ ते म्हणाले, मागील सहा महिन्यापासून ही प्रणाली अवलंबविण्यात येत असून या कालावधीत वाहन चोरीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत़ सीसीटीएनएस ही प्रणाली राबविण्यात नांदेड परीक्षेत्र राज्यात अव्वल ठरले असल्याचे नमूद करून राज्यातील अन्य सात परिक्षेत्रातही या प्रणालीचा अवलंब करण्यात येत असल्याचे सांगितले.
पोलीस दलात पारदर्शकते बरोबरच गतीमानता आणणे हा या प्रणालीचा उद्देश आहे़ सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या अडचणी, तक्रारी सहजपणे पोलीसापर्यंत पोहचविता याव्यात म्हणून ही प्रणाली सुरू केली आहे. सर्व सामान्य नागरिक संबधित पोलीस ठाण्यात तक्रारी देतात़ परंतु त्या नोंदवून घेत जात नसल्याच्या तक्रारी पुढे येतात़ ही समस्या आॅनलाईन पद्धतीने दूर होणार आहे़ या प्रणालीत किती डाटा भरायचा याला महत्व असून सुरक्षिततेला प्राधान्य दिले असल्याचे प्रसाद यांनी सांगितले़
गणेश व दुर्गा महोत्सव मंडळांना पोलीसांची परवानगी घ्यावी लागते़ यंदा या महोत्सवासाठी ही प्रणाली उपयोगी ठरली़ दुर्गा महोत्सवात बहुतांश मंडळांच्या पदाधिकाºयांनी या प्रणालीद्वारे परवानगी मिळविली़ गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर ई - कम्पलेंट नावाच्या पोर्टलवर तक्रारदाराला अगोदर लॉगीन व्हावे लागते़ त्यानंतर आवश्यक माहिती भरल्यानंतर आॅनलाईन तक्रार संबंधित ठिकाणी पोहचते़ त्यामुळे पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही़